You are currently viewing छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य साकारणार

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य साकारणार

अमरावतीच्या मिशन आयएएसने घेतला पुढाकार

अमरावती / (प्रतिनिधी) –
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व आठ वेळा विश्वविक्रम करणारे जागतिक कीर्तीचे कलावंत व अमरावतीचे सुपुत्र अभियंता व चित्रपट निर्माते श्री विराग वानखडे यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर 80 कलाकारांना घेऊन जो महानाट्य उभारण्याचा संकल्प केला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. मराठा सेवा संघ व स्वतः मी या भव्य प्रकल्पाला मान्यता देत असून या महानाट्याच्या पाठीशी मी खंबीरपणे सर्व शक्तीनिशी उभा राहील असे उद्गार सुप्रसिद्ध समाजसेवक व मराठा सेवा संघाचे संस्थापक एड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज चिखली येथे काढले. यावेळी माजी आमदार व एडवोकेट पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अर्धांगिनी व सुप्रसिद्ध समाजसेविका सौ रेखाताई खेडेकर ह्या आवर्जून उपस्थित होत्या.
श्री विराग वानखडे यांनी आठ वेळा जागतिक विक्रम केला असून आता ते नववा विश्वविक्रम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत भव्य स्वरूपात वेगवेगळे कार्यक्रम सादर केलेले आहेत. नुकतेच त्यांचे महा इतिहास हे महानाट्य संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरले आहे. प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांच्या मुंबई कार्यालयाला भेट दिली व त्यांच्यासमोर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य उभारण्याची संकल्पना मांडली. श्री विराग वानखडे यांनी ही कल्पना मान्य केली असून त्यांच्या टीम मध्ये असलेल्या व महाराष्ट्रातील इतर 80 कलाकारांना घेऊन ते हे महानाट्य उभारणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी श्री विराग वानखडे त्यांच्या पत्नी सौ वंदना वानखडे मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जाऊन श्री पुरुषोत्तम खेडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व या छत्रपती श्री शिवाजी महाराज या महानाट्याचा प्रस्ताव मांडला. श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी हा प्रस्ताव उचलून धरला असून हा प्रस्ताव आणल्याबद्दल श्री विराग वानखडे सौ वंदना वानखडे व प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचा पुस्तके देऊन सन्मान केला.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य तयार करून त्याचे प्रयोग संपूर्ण भारतात करण्याचा हा अभिनव प्रयोग आहे. हा खर्चिक प्रयोग जरी असला तरी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जीवन घराघरात पोहोचलेच आहे पण या महानाट्याच्या रूपाने त्याला अजून गती मिळेल आणि म्हणूनच मी या महानाट्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे असेही प्रतिपादन यावेळी एड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.

याप्रसंगी श्री विराग वानखडे यांनी महान नाट्याची पूर्ण रूपरेषा श्री खेडेकर यांना समजावून सांगितली. पटकथा लेखन करण्यासाठी श्री पुरुषोत्तम खेडेकर प्रा. अशोक राणा श्री गंगाधर बनबरे व इतर जेष्ठ संशोधक यांचे सहकार्य घेण्याचे याप्रसंगी ठरविण्यात आले. हा महानाट्याचा प्रस्ताव एड. पुरुषोत्तम खेडेकर यांना इतका भावला असून त्यांनी सर्व शक्तीनिशी या महाराष्ट्राच्या महानाट्याच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रकृती ठीक नसतानाही श्री पुरुषोत्तम खेडेकर या तिन्ही व्यक्तींना सोडण्यासाठी त्यांच्या कारपर्यंत आले व या महानाट्याच्या स्वरूपाला लवकरात लवकर तुम्ही लोकांसमोर सादर करा असा आशीर्वाद देऊन त्यांनी या चमूचा निरोप घेतला.

मराठा सेवा संघाचे संस्थापक व सुप्रसिद्ध समाजसेवक एड. श्री पुरुषोत्तम खेडेकर यांची मान्यता मिळाल्यामुळे मिशन आयएएस परिवारात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या महानाट्याच्या निर्मितीसाठी आवश्यक त्या प्रारंभिक बाबींसाठी तयारी सुरु झाली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य होणार या कल्पनेचे मिशन आयएएस चे महाराष्ट्रातील ठिकठिकाणी अभिनंदन होत असून या महानाट्याचा पहिला प्रयोग हा दिवाळीनंतर संपन्न होणार आहे. अशी माहिती या महानाट्याचे मुख्य संयोजक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व निर्माते व दिग्दर्शक श्री विराग वानखडे यांनी संयुक्तरित्या एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
=============
महोदय, प्रकाशनार्थ सादर

प्रतिक्रिया व्यक्त करा