You are currently viewing कनिका आणि ऋचा यांनी आरसीबीला मिळवून दिला पहिला विजय

कनिका आणि ऋचा यांनी आरसीबीला मिळवून दिला पहिला विजय

*युपीचा तिसरा पराभव*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अखेर महिला प्रीमियर लीगमध्ये पहिला विजय मिळाला आहे. गुरुवारी (१५ मार्च) झालेल्या स्पर्धेतील १३व्या सामन्यात त्यानी युपी वॉरियर्सचा पाच गडी राखून पराभव केला. स्टार खेळाडूंनी सजलेल्या स्मृती मंधानाच्या संघाला गेल्या पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे, युपीचा हा पाच सामन्यांमधला तिसरा पराभव आहे. त्यांना आतापर्यंत दोन विजय मिळाले आहेत.

सोफी डिवाइन, स्मृती मंधाना, हिथर नाइट, एलिस पैरी, मेगन शुट आणि रेणुका सिंह ठाकुर या अनुभवी खेळाडूंना जे जमले नाही ते तरुण कनिका आहुजा आणि ऋचा घोष यांनी हे आश्चर्यकारकरीत्या केले आहे. २० वर्षीय कनिकाने ४६ आणि १९ वर्षीय ऋचाने नाबाद ३१ धावा केल्या. आरसीबीने युवांच्या जोरावर खाते उघडले आहे, मात्र स्पर्धेत टिकण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. याशिवाय इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.

आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युपी वॉरियर्सचा संघ १९.३ षटकात १३५ धावांवर गारद झाला. आरसीबीने १८ षटकात ५ विकेट गमावत १३६ धावा करत सामना जिंकला. त्यांचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे.

कनिकाने ३० चेंडूत ४६ धावा केल्या. त्याचवेळी ऋचाने ३२ चेंडूत ३१ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. अनुभवी हिथर नाइटने २४ धावांचे योगदान दिले. सोफी डिवाइनने १४ आणि एलिस पैरीने १० धावा केल्या. कर्णधार स्मृती मंधाना पुन्हा एकदा अपयशी ठरली. ती खाते न उघडताच तंबूत परतली. श्रेयंका पाटीलने नाबाद पाच धावा केल्या. युपी वॉरियर्सकडून दीप्ती शर्माने दोन बळी घेतले. सोफी एक्लेस्टोन, देविका वैद्य आणि ग्रेस हॅरिस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

तत्पूर्वी, युपीकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक ४६ धावा केल्या. दीप्ती शर्मा आणि किरण नवगिरे यांनी प्रत्येकी २२ धावा केल्या. सोफी एक्लेस्टोनने १२ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू एलिस पैरीने या सामन्यात आरसीबीसाठी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. सोफी डिव्हाईन आणि आशा शोबाना यांना प्रत्येकी दोन तर मेगन शुट आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कनिका आहुजाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

उद्या दिल्ली विरुद्ध गुजरात सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दिल्ली संघ तक्त्यातील दुसरे स्थान कायम ठेवण्याचा सर्वंकष प्रयत्न करेल तर गुजरात पुन्हा विजयी रथावर आरूढ होण्याचा प्रयत्न करेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 6 =