You are currently viewing जिल्हा आरोग्य खाते कधी गंभीर होणार?

जिल्हा आरोग्य खाते कधी गंभीर होणार?

सावंतवाडीत लोकांच्या सहनशीलतेचा अंत..

विशेष संपादकीय…

केंद्र आणि राज्य सरकार लोकांना लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करत आहे, टीव्हीवर करोडो रुपये खर्च करून सिने कलाकारांना घेऊन जाहिराती करत आहे. परंतु आरोग्य विभागाकडे कोविड-१९ प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. वयस्कर माणसे लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात जाऊन ताटकळत बसतात, त्यामुळे लसीकरणाच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे वयोवृद्ध, आणि ४५ वर्षांवरील कित्येक लोक विनाकारण कामावर सुट्टी घेऊन आरोग्य केंद्रात येऊन दिवस तर वाया घालवतातच आणि मानसिक शारीरिक त्रास करून घेतात.
उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आज सकाळी लसीकरणासाठी सर्वच वयोगटातील लोकांनी गर्दी केली होती. लसीकरणाच्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी देखील मर्यादित जागा असल्याने सोशल डिस्टनसिंग चा देखील फज्जा उडत आहे. उपजिल्हा रुग्णालयात लस संपल्यानंतर कोणतीही माहिती मिळत नसल्याने व लसीकरण केंद्रावर माहिती देण्यासाठी सकाळी ९.३० वाजून गेले तरी कोणीही उपस्थित नसल्याने लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला व तिथे लोकांची गर्दी पाहून दुसऱ्या विभागाच्या उपस्थित झालेल्या नर्सवर लोकांनी प्रश्नांचा भडिमार केला. लसीकरणासाठी आलेले काही लोक दोन दोन वेळा लस संपली या कारणास्तव यापूर्वी देखील परतून गेले होते. लसीकरण केंद्रावर माहितीचा लावलेला कापडी फलक उलटा असल्याने लोकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती.
जिल्हा आरोग्य विभागाने तसेच उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने लस संपल्यानंतर त्याची माहिती मीडियामध्ये अथवा सोशल मीडियाला दिल्यास गावागावातील लोक भीतीपोटी लस घेण्यासाठी रिक्षाला पैसे देऊन येतात त्यांना आर्थिक मानसिक त्रास होणार नाही. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आधीच लोक घाबरलेले आहेत, त्यातच आरोग्य केंद्रात आल्यावर लस उपलब्ध नसल्याने मानसिक त्रास होतो. जिल्हा आरोग्य विभागाने लोकांची हेळसांड न होऊ देता लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी उपस्थित लोकांकडून करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =