You are currently viewing गुजरातमधील भरकटलेल्या निराधार महिलेला रूपा गौंडर-मुद्राळे यांचा मायेचा आधार!

गुजरातमधील भरकटलेल्या निराधार महिलेला रूपा गौंडर-मुद्राळे यांचा मायेचा आधार!

गुजरातमधील भरकटलेल्या निराधार महिलेला रूपा गौंडर-मुद्राळे यांचा मायेचा आधार!

पारपोली येथे आढळलेल्या महिलेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून सविता आश्रमात आश्रय; नातेवाईकांचा शोध सुरू

सावंतवाडी :

गुजरात राज्यातील भावनगर येथून चुकीच्या रेल्वेत बसल्याने महाराष्ट्रात आलेल्या एका निराधार महिलेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा गौंडर-मुद्राळे यांनी माणुसकीच्या भावनेतून आधार दिला. त्यांच्या तत्परतेमुळे या महिलेला सुरक्षित आश्रय मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पारपोली येथे गुजरातमधील एक महिला भरकटलेल्या अवस्थेत फिरताना आढळून आली होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर-मुद्राळे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेची विचारपूस केली.

या महिलेचे नाव हिरनबेन देवजीभाई गोयल रापडिया (वय ४०, रा. अडवाळ, रामापीर मंदिराजवळ, तालुका तंदुका, जिल्हा भावनगर, गुजरात) असे आहे. चुकीच्या रेल्वेत बसल्याने आपण येथे पोहोचल्याचे तिने सांगितले. गुजरातमध्ये आपला मोठा परिवार असून एक भाऊ हिरा कारखान्यात, तर दुसरा भाऊ पोलीस सेवेत असल्याची माहितीही तिने दिली.
रूपा गौंडर-मुद्राळे यांनी या महिलेला आपल्या सोबत आणून आंघोळीसाठी पाणी, स्वच्छ कपडे आणि जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर तिला सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांच्या सहकार्याने आणि रीतसर पत्रव्यवहार करून या महिलेला सध्या सविता आश्रमात सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे.

दरम्यान, हिरनबेन यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर-मुद्राळे व त्यांची टीम तसेच संस्थेचे सल्लागार शैलेश पै प्रयत्नशील आहेत.
अनोळखी प्रदेशात भरकटलेल्या महिलेला माणुसकीच्या नात्याने दिलेला हा आधार सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा