You are currently viewing विट्यात मंडई असताना रस्त्यावरच भाजीबाजार!

विट्यात मंडई असताना रस्त्यावरच भाजीबाजार!

नाना पाटील पुतळा परिसरासह प्रमुख रस्त्यांवर विक्रेत्यांचा ठिय्या

वाहतूक कोंडीने नागरिक हैराण, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

विटे / प्रदीप जोशी :

शहरात भाजीपाला विक्रीसाठी स्वतंत्र मंडईची व्यवस्था असताना ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजी व फळविक्रेत्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरच आपले बस्तान मांडले आहे. नाना पाटील पुतळा परिसर, कराड रस्ता, लेंगरे रस्ता तसेच विवेकानंदनगर परिसरात रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही या गर्दीतून वाट काढताना कसरत करावी लागत आहे. स्वतंत्र मंडई असतानाही रस्त्यांवरील भाजीबाजाराला आळा घालण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश का येत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागातून शेतकरी व विक्रेते भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी विटा शहरात येतात. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे; मात्र त्यासाठी शहरातील प्रमुख रस्तेच बाजारपेठ बनणे कितपत योग्य आहे? नाना पाटील पुतळा परिसरासह कराड रस्ता, लेंगरे रस्ता आणि विवेकानंदनगर येथे रस्त्याच्या कडेला विक्री सुरू असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होत आहे. त्यातच रस्त्यालगत दुचाकींची पार्किंग आणि वाहनांची सततची वर्दळ यामुळे कोंडीत भर पडत आहे.

विशेषतः नाना पाटील पुतळा परिसरात ही परिस्थिती स्पष्टपणे दिसून येते. रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री, उभी केलेली वाहने आणि पादचाऱ्यांची गर्दी यामुळे वाहनचालकांना मार्ग काढणे अवघड होत आहे. एखाद्या वाहनाला बाजू देताना दुसऱ्या वाहनाची कोंडी होते. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठीही पुरेशी जागा राहत नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना अशा गर्दीतून मार्ग काढताना धोका निर्माण होऊ शकतो.

स्वतंत्र मंडई कशासाठी?

विटा शहरात भाजीपाला विक्रीसाठी स्वतंत्र मंडई असताना विक्रेत्यांना तेथे व्यवस्थित जागा उपलब्ध करून देणे, त्यांचे नियोजन करणे आणि रस्त्यावरील अनधिकृत विक्रीला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे ही नगरपालिकेची जबाबदारी नाही का? मंडईची व्यवस्था असताना शहरातील प्रमुख रस्त्यांवरच बाजार भरत असेल, तर त्या व्यवस्थेचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

केवळ विक्रेत्यांना हटवून प्रश्न सुटणार नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचा रोजगारही महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांचे योग्य पुनर्वसन करून मंडईत किंवा वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा नियोजित ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र यासाठी ठोस नियोजन आणि इच्छाशक्ती आवश्यक आहे.

पालिका प्रशासनाला जाग कधी येणार?

रस्त्यांवरील भाजीबाजारामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी वाहनधारक आणि पादचाऱ्यांकडून होत आहेत. तरीही या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतुकीचे नियोजन, विक्रेत्यांचे पुनर्वसन आणि रस्ते मोकळे ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.

नगरपालिकेने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नाना पाटील पुतळा परिसर, कराड रस्ता, लेंगरे रस्ता आणि विवेकानंदनगर येथील विक्रेत्यांचे सर्वेक्षण करावे. त्यांना स्वतंत्र व सोयीस्कर जागा उपलब्ध करून द्यावी. रस्ते, चौक आणि पादचारी मार्ग मोकळे ठेवण्यासाठी ठोस अंमलबजावणी करावी.

विक्रेत्यांचा रोजगारही वाचला पाहिजे आणि नागरिकांचे रस्तेही मोकळे राहिले पाहिजेत. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणे अशक्य नाही. मात्र त्यासाठी केवळ सूचना देऊन किंवा तात्पुरती कारवाई करून चालणार नाही; कायमस्वरूपी पुनर्वसनाची गरज आहे.

शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करायला लावून नगरपालिका प्रशासन आणखी किती दिवस गप्प बसणार? स्वतंत्र मंडई असताना रस्त्यावरच भाजीबाजार भरत राहणार असेल, तर शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन नेमके कशासाठी? आता तरी पालिका प्रशासनाने जागे व्हावे, अशी मागणी विटेकर नागरिकांतून होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा