You are currently viewing सावंतवाडील प्रख्यात कवयित्री प्रा.डॉ.शरयू आसोलकर यांचे अपघाती निधन
Oplus_16908288

सावंतवाडील प्रख्यात कवयित्री प्रा.डॉ.शरयू आसोलकर यांचे अपघाती निधन

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे झालेल्या भीषण कार अपघातात सावंतवाडी येथील प्रख्यात कवयित्री व प्राध्यापिका डॉ. शरयू कृष्णा आसोलकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सोमवारी सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत केली. नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी चंद्रकांत झोरे यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

जखमींना नांदगाव केंद्राच्या तसेच नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून कणकवली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉ. शरयू आसोलकर यांचा मृत्यू झाला तर चालक त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डॉ. शरयू आसोलकर या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. अध्यापन क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांनी कवयित्री म्हणूनही साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग होता.

त्यांच्या आकस्मिक निधनाने शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या निधनाने सावंतवाडी परिसरासह साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा