You are currently viewing कौंडण्यपूर येथे अद्ययावत स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार – रविराज देशमुख 

कौंडण्यपूर येथे अद्ययावत स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणार – रविराज देशमुख 

अमरावती :

विदर्भातील मुले बहुसंख्येने प्रशासनात जावीत यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत. अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथे श्री अंबा रुक्मिणी महोत्सव येत्या 21 22 व 23 नोव्हेंबरला संपन्न होत आहे. या पवित्र ठिकाणी विदर्भातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी अद्ययावत स्पर्धा परीक्षा परीक्षा केंद्र उभारण्याचा संकल्प आज श्री रविराज देशमुख यांनी सोडला. महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेत असलेल्या मिशन आयएएस या संस्थेचे संचालक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे व सुधीर चक्रे श्री रविराज देशमुख यांना भेटावयास गेल़े असता त्यांनी हा विचार बोलून दाखविला. या स्पर्धा परीक्षा केंद्राला सांदिपनी यांचे नाव देण्याचा मानस त्यांनी यावेळेस व्यक्त केला.

 

अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर हे प्राचीन काळापासून सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रामध्ये भाविकांबरोबरच विदर्भातील स्पर्धा परीक्षेची आयएएस एमपीएससी पोलीस भरती याची तयारी करण्यासाठी एक केंद्र तयार करण्याचा विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्याकडे आपण रितसर प्रस्ताव दाखल करणार आहोत अशी माहिती त्यांनी या वेळेस दिली.

श्री रविराज देशमुख हे मिशन आयएएस या उपक्रमांशी गेल्या अनेक वर्षापासून जुळलेले असून ते मिशन आय ए एस च्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी सहकार्य करीत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री रविराज देशमुख हे मिशन आय ए एस च्या सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनपा आयुक्त यांच्याकडे घेऊन जातात. त्यांच्याशी सुसंवाद घडवून आणतात आणि त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी स्नेहभोजन पण देतात.

 

धार्मिक कार्याबरोबर शैक्षणिक कार्य करण्याचा त्यांचा संकल्प असून श्री अंबा रुक्मिणी महोत्सव समितीचे मुख्य संयोजक म्हणून त्यांनी 21 22 व 23 या तारखांना हा प्रचंड मोठा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात सहभागी होण्याची साठी पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 23 तारखेला येण्याचे मान्य केले असून या महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहतील त्यासाठी श्री रविराज देशमुख प्रयत्न करीत आहेत.

 

कौंडण्यपूर येथे धार्मिक उत्सवाबरोबरच स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम देखील सातत्याने राबविण्यात येतील. केंद्र तयार व्हायला वेळ लागेल तोपर्यंत कौंडण्यपूर उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा उपयोग करून या सांदीपनी अकादमीची रितसर सुरुवात करण्याचा मनोदय त्यांनी यावेळेस व्यक्त केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व लोकप्रतिनिधींनी व सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांनी अनुकरण करून आपापल्या भागात स्पर्धा परीक्षा केंद्र तयार करावीत व आपापल्या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करावे असा आशावाद या प्रसंगी मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा