कणकवली-नांदगाव येथे भीषण अपघात
सावंतवाडीतील प्राध्यापिका शरयू आसोलकर यांचे निधन
इनोव्हा कार दुभाजकावर चढून खांबाला धडकली; संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्राध्यापिका व लेखिका काळाच्या पडद्याआड, भावावर कणकवलीत उपचार सुरू
सावंतवाडी :
सावंतवाडी माठेवाडा येथील रहिवासी आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथील प्राध्यापिका तसेच लेखिका श्रीमती शरयू कृष्णा आसोलकर (वय ५९) यांचे आज सकाळी कणकवली-नांदगाव येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे सावंतवाडी शहरासह माठेवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरयू आसोलकर या आपल्या बहिणीला राजापूर येथे सोडण्यासाठी इनोव्हा कारमधून गेल्या होत्या. तेथून सावंतवाडीला परत येत असताना कणकवली-नांदगाव येथील महामार्गावर त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर चढून खांबाला धडकली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाऊ वैभव आसोलकर यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताची बातमी समजताच सावंतवाडीतील माठेवाडा परिसरातील नागरिकांनी तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेत मदतकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते नागेश जगताप, सुदेश नेवगी, महेश बांदेकर यांच्यासह माठेवाड्यातील मित्रपरिवार मदतीसाठी उपस्थित झाला.
शरयू आसोलकर या कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. अध्यापन क्षेत्राबरोबरच लेखिका म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माठेवाड्यातील मित्रपरिवार,
नातेवाईक आणि हितचिंतकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचे जवळचे नातेवाईक कोल्हापूर आणि बंगळुरू येथून सावंतवाडीकडे रवाना झाले आहेत. ही माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली.
