पुणे / हडपसर :
शुभ दीपावली सणामध्ये धनत्रयोदशी म्हणजे सोने, चांदी अशा धनाच्या पूजनासोबत आरोग्य धनसंपदेचीसुद्धा लोकं पूजा करतात. कारण हा दिवस भगवान धन्वंतरी जयंती दिवस आहे. याच चतुर्भुज भगवान धन्वंतरीने एका हातात आरोग्यमय जीवनाचा अमृत कलश तर दुसरा हातात पुस्तकसुद्धा घेतले आहे. म्हणजे धनसंपत्ती, निरामय आरोग्यासह अक्षरधनाचा शोध घेण्यासाठी कवी साहित्यिकांना आज काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा लाभला आहे. असा हा अमृतयोग हेच सांगतो आहे की साहित्यिकांनी धनत्रयोदशी दिवशी आपले अक्षरधन पूजन करावे असे विचार प्रमुख पाहुणे तथा चतुरस्त्र कवी विनोद अष्टुळ यांनी भाषणातून व्यक्त केले.
निरामय हडपसर साहित्य मंच आणि अभिनंदन प्रकाशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भगवान धन्वंतरी पूजन तसेच कवी विजय कामथे यांच्या फुलपाकळ्या या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा स्व.विठ्ठल तुपे नाट्यगृह हडपसर येथे आयोजित केला होता. त्यावेळी अष्टुळ बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तुपे नाट्यगृहाच्या संस्थापिका उज्वला ठाणगे, विशेष उपस्थिती हडपसर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रणवरे, आधारस्तंभ हडपसर नाट्य परिषदेचे खजिनदार अमोल दुगाणे, प्रमुख पाहुणे साहित्य सम्राट पुणे संस्थेचे संस्थापक विनोद अष्टुळ, आयोजक निरामय साहित्य मंचाचे अध्यक्ष डॉ.मनोज लडकत आणि काव्यसंग्रहाचे कवी.विजय कामथे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरीचे प्रत्येकाच्या शुभहस्ते पूजन तसेच महाराष्ट्र गीत गायनाने झाली. फुलपाकळ्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर कवी विजय कामथे सरांनी कविता सुचली कशी आणि फुलपाकळ्या काव्यसंग्रह तयार झाला कसा यावर अतिशय प्रांजळपणे प्रास्ताविकात आपले विचार मांडले. मान्यवरांच्या हस्ते कवीचा आणि उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्यानंतर साहित्य सम्राट पुणे संस्थेचे २३१वे कवी संमेलन उपस्थित कवी कवयित्रींच्या बहारदार सादरीकरणाने संपन्न झाले.
या कवी संमेलनामध्ये माननीय रमेश जाधव, प्रिया दामले, प्रा.डॉ.सुरेश वाळेकर, भरत माने, श्रीकांत ढोबळे, रमाकांत ढोबळे, डॉ.विलास बाबर, गोरक्षनाथ मोरे, किशोर कसबे, डॉ.राहुल भोसले, साहेबराव खामकर, दशरथ दुनघव, संजीवनी जगताप, नंदकिशोर गावडे, प्रा.शिवराज साने, प्रा.शिवाजी गायकवाड, प्रा.गौरव नेवसे, विनोद ताम्हाणे, डॉ.गणेश पुंडे, नानाभाऊ माळी, डॉ.मनोज लडकत, विजय कामथे आणि विनोद अष्टुळ अशा तीस शब्दप्रभूंनी आपल्या उत्स्फूर्त विविध विषयांवरील काव्यरचना सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि आभार डॉ.मनोज लडकत यांनी व्यक्त केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाचे सांगता झाली.
