You are currently viewing मसुरे येथे कोमसाप – कथामाला, मालवण संयुक्त आयोजित “वाचन संस्कृती अभियान”

मसुरे येथे कोमसाप – कथामाला, मालवण संयुक्त आयोजित “वाचन संस्कृती अभियान”

मालवण (मसुरे) :

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण आणि कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. मुलांमध्ये, पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सकस वाचन संस्कृती वाढीला लागावी या उद्देशाने ग्रंथ वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम सन्मेष मसुरेकर, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती मसुरे नं. 1 यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला व कोमसाप मालवण, सदानंद कांबळी (बाल साहित्यिक), शर्वरी सावंत (मुख्याध्यापिका), शिवराज सावंत (राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक), गुरुनाथ ताम्हणकर (कथामाला संपर्कप्रमुख) उपस्थित होते. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या वतीने पालक वर्गाला ललित मासिकाचे अंक, विद्यार्थी वर्गाला कल्पना मलये लिखित ‘कारटो’ या पुस्तकाचे वितरण तसेच विद्यार्थ्यांना साधनाचे बालकुमार अंक भेट देण्यात आले.

वाचनाचे महत्त्व बालक, पालक आणि शिक्षकांना पटवून देताना सुरेश ठाकूर म्हणाले, “ह्या मोबाईलच्या युगात वाचनाचा छंद सर्वांनी जपावा. वाचनामुळे विचारांना स्पष्टता येते. भाषेला वळण प्राप्त होते. अभिव्यक्तीचे सामर्थ्य वाढते. विचारांचे संक्रमण होते आणि सर्वांचे व्यक्तिमत्व समृद्ध होते. म्हणून सकस साहित्य वाचा,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री. विनोद सातार्डेकर, श्री. गोपाळ गावडे, सौ. रामेश्वरी मगर, (सर्व शिक्षक मसुरे नं. 1), सौ. सुखदा मेहेंदळे, श्री. सुहास गावकर (मसुरे कावा), श्री. प्रशांत पारकर, श्री. सचिन डोळस, सौ. स्वाती कोपरकर, कविता सापळे (मसुरे देऊळवाडा), सौ. शुभदा रेडकर, श्री. राजेंद्र धारपवार, श्री. उदय कदम, सौ. पूर्वा केळूसकर (वेरली) सौ. श्रद्धा वाळके, सौ. अक्षता कोरगावकर (मसुरे भोगलेवाडी) आदी शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. यासोबतच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेष मसुरेकर, लक्ष्मी पेडणेकर, मयुरी शिंगरे, दीप्ती पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यापूर्वी पुस्तक दिनाचे औचित्य साधून आचरे प्रभागात ज्येष्ठ नागरिकांना ग्रंथदान सोहळा साजरा झाला होता. मसुरे प्रभागाच्या या वाचन संस्कृती सोहळ्याचे आभार प्रदर्शन विनोद सातार्डेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा