विटा नगरपरिषदेकडून ४०२ लाभार्थ्यांना १८ लाख ९ हजार रुपयांचे अनुदान वितरित
प्रति लाभार्थी ४ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य; दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी नगरपरिषदेचा पुढाकार
विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
विटा शहरातील दिव्यांग बंधू-भगिनींना आर्थिक आधार देऊन त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने विटा नगरपरिषदेच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शहरातील ४०२ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण १८ लाख ९ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करून वितरित करण्यात आले. या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांची दीपावली अधिक आनंददायी होण्यास मदत होणार आहे.
नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, महिला व बालकल्याण सभापती सौ. अपर्णा पाटील, उपसभापती सौ. शीला लिपारे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील तसेच सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांच्या उपस्थितीत अनुदान वितरणाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे म्हणाल्या, “दिव्यांग बांधवांची दीपावली गोड व्हावी आणि सणाच्या काळात त्यांना आर्थिक हातभार मिळावा, या उद्देशाने नगरपरिषदेच्या माध्यमातून हे अनुदान देण्यात आले आहे. विटा नगरपरिषद दिव्यांग बांधवांच्या हितासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर राहील.”
उपनगराध्यक्ष अमोल बाबर म्हणाले, “विटा नगरपरिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या अनुदानाचा लाभ दिव्यांग बांधवांना दीपावलीपूर्वी मिळावा, यासाठी महिला व बालकल्याण विभागाने विशेष प्रयत्न केले. शहरातील ४०२ दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये याप्रमाणे अनुदान जमा होत असल्याचा मनापासून आनंद आहे. दिव्यांग बांधवांना सन्मानाने जीवन जगता यावे, त्यांना आर्थिक आधार मिळावा आणि शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.”
दिव्यांग बांधवांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ अनुदानाचे वाटप न करता समाजातील वंचित घटकांना सन्मान, आधार आणि आत्मविश्वास देण्याच्या दृष्टीने विटा नगरपरिषदेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती सौ. अपर्णा पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले.
