पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : वेलवेट कविशा पब्लिकेशनतर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा तसेच राज्यस्तरीय कथास्पर्धा आणि काव्यस्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान समारंभ रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सदाशिव पेठेतील विष्णू प्रसाद सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लेखक कृष्ण केशव देशमुख यांच्या ‘खवय्येगिरी’ या पुस्तकाचे लोकार्पण दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक आशिष तागडे, लेखक आणि ‘हलकंफुलकं’कार प्रशांत कुलकर्णी तसेच वर्षा ठुकरूल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कवी बबन हिरामण मोहिते यांच्या ‘काव्य पुष्पांजली’ या कवितासंग्रहाचे लोकार्पण लेखिका ॲड. मीताली साळवेकर आणि वर्षा ठुकरूल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ॲड. मीताली साळवेकर या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. लेखक-कवी देवा झिंजाड, ॲड. मीताली साळवेकर आणि वर्षा ठुकरूल यांच्या उपस्थितीत ‘अनुभूती – माणसातला देव’ या कथासंग्रहाचे तसेच ‘काव्यधन’ या काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले.
प्रसिद्ध लेखक-कवी देवा झिंजाड यांच्या मनोगताने कार्यक्रमाला भावनिक उंची प्राप्त झाली. त्यांनी सादर केलेल्या कवितांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः आई-वडिलांवरील एका कवितेने सभागृहातील अनेकांना भावूक केले. त्यांच्या अनुभवपूर्ण विचारांतून साहित्यनिर्मितीच्या विविध पैलूंना उजाळा मिळाला. कार्यक्रमाचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेत वेलवेट कविशा पब्लिकेशनच्या लेखिका आणि प्रकाशिका वर्षा ठुकरूल यांचे विशेष योगदान होते. उपस्थित प्रत्येक लेखक, कवी आणि सभासदाची आस्थेने विचारपूस करताना त्यांनी जुन्या-नव्या सभासदांची नावेही लक्षात ठेवली आणि त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या या आपुलकीच्या वागणुकीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. डॉ. सुनीता चौधरी, मृणाल भोईटे, स्वाती कुंभार, स्मिता मिलिंद, जयमाला देवरे आणि पवन देशमुख या सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध कामकाजातून मोलाचे योगदान दिले.
वेलवेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनुभूती – माणसातला देव’ या विषयावर राज्यस्तरीय कथास्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांक विभागून अभिजित देसाई यांच्या ‘आणि कडुकर आजी गोड हसल्या’ आणि स्मिता काटकर यांच्या ‘मसिहा’ या कथांना मिळाला. द्वितीय क्रमांक विभागून दिनेश भदाणे यांच्या ‘देवाची शॉल’, डॉ. यशवंत सुरोशे यांच्या ‘माणसातला देव’ आणि जुही लिडबे यांच्या ‘माणसाची वारी देवाच्या दारी’ या कथांची निवड झाली. तृतीय क्रमांक विभागून शितल पाटील यांच्या ‘देव गाभाऱ्यात की माणसांत?’, गौरी काळे यांच्या ‘देवमाणूस’ आणि श्रीपाद टेंबे यांच्या ‘देवाचा पत्ता बदलला’ या कथांना देण्यात आला.
कथास्पर्धेतील लक्षवेधी कथांमध्ये मिलिंद मोहरीर यांची ‘सैनिकहो तुमच्यासाठी’, सुमेध रानडे यांची ‘आनंदाचं डबकं’, रेणुका आशिष यांची ‘कोविडसोबत जगतानाचे क्षण’, शरयू गीते यांची ‘आयुष्याची नवी पहाट’, हर्षवर्धन शेटे यांची ‘परतफेड’, अश्विनी निवर्गी यांची ‘अनाहूत देवमाणूस’ आणि शरयू महाजन यांची ‘देव तारी त्याला कोण मारी’ यांचा समावेश आहे. उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी सुरेश बेडेकर यांच्या ‘भंगारवाला’, वैशाली गावंडे यांच्या ‘माणुसकी’, डॉ. सुशांत भालेराव यांच्या ‘ओढ स्पर्शाची’, माधवी भूत यांच्या ‘ती सात मिनिटे’, तृप्ती देव यांच्या ‘कर्तव्यातला देव’, प्राची परचुरे वैद्य यांच्या ‘देव अनुभवला’, स्नेहा मुशरीफ यांच्या ‘प्रचिती’ आणि श्रद्धा कांबळे यांच्या ‘उन्हात राबणारे बाबा’ या कथांची निवड झाली. विशेष उल्लेखनीय कथांमध्ये प्रियांका घोडके यांची ‘भाकरीतला विठ्ठल’, अश्विनी उपाध्ये यांची ‘अनुभूती’, तनुजा प्रभुदेसाई यांची ‘भूमिका’, हेमांगी बोंडे यांची ‘देवदूत’, ओंकार कुचेकर यांची ‘जेव्हा माणसांत देव दिसला’, श्वेता कुलकर्णी यांची ‘प्रचिती त्याच्या अस्तित्वाची’, शिल्पा ठोमणे यांची ‘हिजडा कोण?’ आणि चंद्रकांत शिणगारे यांची ‘माणसातला कृपावंत’ या कथांचा समावेश आहे.
वेलवेट कविशा पब्लिकेशनतर्फे आयोजित काव्यस्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी एकूण ५१ कविता प्राप्त झाल्या. विविध विषय आणि अभिव्यक्तीशैली असलेल्या कवितांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. अनुज केसरकर यांच्या ‘कायशार’ या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक विभागून निशा पराग काळे यांच्या ‘कविते तुझ्याविना’ आणि प्रज्ञा बेलखोडे यांच्या ‘कवितायन’ या कवितांना मिळाला. तृतीय क्रमांक विभागून सुप्रिया जोशी यांच्या ‘नितळ तळाशी’ आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांच्या ‘निःशब्द जखमा’ या कवितांना देण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी मीनल शेकटकर कांबळे यांच्या ‘झाडांचे अस्तित्व’, नागेश हुलवळे यांच्या ‘पुस्तकांशी जोडू नाळ’, शिल्पा जोगदंड यांच्या ‘माझ्या मनातली टिकली’, आरती धुमाळ यांच्या ‘अशी एक राधा हवीच ना’ आणि स्मिता यशवंत चोथे यांच्या ‘जखमा नात्यांच्या’ या कवितांची निवड झाली. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कथाकार आणि कवी-कवयित्रींचे आयोजकांनी आभार मानले. काव्यस्पर्धेतील सर्व कविता प्रातिनिधिक कवितासंग्रहात प्रकाशित करण्यात आल्या. साहित्यिकांच्या लेखणीला व्यासपीठ देतानाच त्यांच्या सर्जनशीलतेचा सन्मान करणारा हा उपक्रम ठरला.
