You are currently viewing सन्मान – नंदादीप

सन्मान – नंदादीप

*जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सन्मान – नंदादीप*

 

सन्मान देणे जमेना सर्वांना,

ओंजळीत असे तेच देई जना ॥ध्रु॥

 

काटे मनात ज्याच्या रुजले,

स्पर्शात त्याच्या काटेच टोचले,

फुलबाग ज्याच्या हृदयी फुलला,

सुगंध त्याचा सर्वत्र दरवळला ॥१॥

 

रिकाम्या विहिरीला पाणी नसे,

रिक्त मनाला सन्मान कसे,

अहंकाराच्या अंधारात बुडले,

तेज दुसऱ्याचे त्यांना न दिसले ॥२॥

 

सन्मानाच्या वाटेवर जो चाले,

नम्रतेचे पाणी मनाला घाले,

पद-पैशापलीकडे जाऊन पाहे,

माणसातला माणूस तो जाणे ॥३॥

 

झुकणे त्याचे पराभव नसे,

मोठेपणाची ती खूण असे,

फळांनी लदले झाड जसे वाके,

मोठा माणूस सन्मानाने झुके ॥४॥

 

सन्मान मागून कधी न मिळे,

मनाच्या श्रीमंतीतून तो फुले,

जो देतो तोच खरा श्रीमंत,

देणे हाच सन्मान महान ॥५॥

 

कौतुक करो वा कोणी न करो,

कर्तव्याचा नंदादीप तेवत ठेवू,

सरितेसारखे अविरत वाहू,

वैचारिक गंगा सेतूपलीकडे नेऊ ॥६॥

 

माय मराठीची उंची वाढावी,

यासाठी स्वतःला वाहून घ्यावे,

साहित्यिक, कवी, लेखक सारे,

एकत्र येऊन मान वाढवावे ॥७॥

 

अक्षरांचा दिवा हाती घेऊया,

मातीचा सुगंध जगात नेऊया,

सन्मान देऊन सन्मान घेऊया,

माय मराठीला शिखरावर नेऊया ॥८॥

 

@इंदुमाय – श्री प्रभाकर भामरे, धुळे

प्रतिक्रिया व्यक्त करा