नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
आरोंदा जलजीवन मिशनमध्ये लाखोंच्या अपहाराचा आरोप; दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आव्हान
सावंतवाडी : सावंतवाडी येथील नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, केवळ सभापती प्रतीक बांदेकर यांना बळीचा बकरा करू नये, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली आहे. दरम्यान, आरोंदा येथील जलजीवन मिशन कामाच्या योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. त्यामुळे जुन्यात विहिरीची रंगरंगोटी करून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.
श्री. राऊळ यांनी आज येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेऊन पालिकेतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली. यावेळी उपाध्यक्ष अशोक धुरी, तालुकाप्रमुख राजू शेटकर, गोकुळदास गोटे, आबा केरकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. राऊळ पुढे म्हणाले, नगरपालिकेत भ्रष्टाचाराचे प्रमाण आता टोकाला पोहोचले असून सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा प्रशासनावरील अंकुश पूर्णपणे सुटला आहे. नगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला, सभात्याग करावा लागला आणि त्यानंतर सभापतींना राजीनामा द्यावा लागला. यावरून सत्ताधारी लोकप्रतिनिधी किती ‘सक्षम’ आहेत हेच उघड दिसून येते.
या प्रकरणात केवळ सभापतींचा राजीनामा पुरेशी बाब नसून, भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. तसेच यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची तातडीने कारवाई झाली पाहिजे. जर स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्री खरोखरच सक्षम असतील, तर त्यांनी या भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
दरम्यान, जलजीवन मिशनअंतर्गत आरोंदा येथे आयोजित करण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलार्पण कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि माजी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
आरोंद्यातील गैरव्यवहाराची माहिती देताना त्यांनी सांगितले की, जाधववाडी येथे २००५-२००६ मध्ये ‘यशवंत ग्राम समृद्धी योजना’ अंतर्गत सुमारे ८ ते ९ लाख रुपये खर्चून नळ पाणीपुरवठा योजना राबवली गेली होती आणि २००९ मध्ये ती विहीर पूर्ण झाली होती. मात्र, आता जलजीवन मिशनअंतर्गत कोणतीही नवी विहीर न बांधता, केवळ त्याच जुन्या विहिरीवर रंगरंगोटी करून जलार्पणाचा बनाव रचण्यात आला. त्यामुळे जलजीवन मिशनअंतर्गत या विहिरीसाठी आलेला निधी नक्की गेला कुठे? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून माहिती अधिकाराखाली सर्व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत.
सावंतवाडी नगरपालिका असो वा आरोंदा ग्रामपंचायत, सर्वत्र भ्रष्टाचार फोफावला असून लोकप्रतिनिधी व पालकमंत्र्यांचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असा आरोप रुपेश राऊळ यांनी शेवटी केला.
