You are currently viewing ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगाच्या निदानावर विशेष भर

सिंधुदुर्ग :

राज्यातील असंसर्गजन्य आजारांचे (NCDs) वाढते प्रमाण लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे १०० दिवसांचे विशेष अभियान १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३० वर्षांवरील नागरिकांची घरोघरी तसेच आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत असून, आजारांचे लवकर निदान व वेळेत उपचार करण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी कळविले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य पथकांमार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये मधुमेहासाठी ६३ हजार ३०५, उच्च रक्तदाबासाठी ६४ हजार २५१, तोंडाच्या कर्करोगासाठी ५८ हजार ४६१, स्तन कर्करोगासाठी २४ हजार १२६ आणि गर्भाशय मुख कर्करोगासाठी ११ हजार ५८५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

घरोघरी सर्वेक्षणातून पात्र नागरिकांची यादी

अभियानांतर्गत आशा स्वयंसेविकांमार्फत ३० वर्षांवरील नागरिकांचे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. गेल्या एक वर्षात मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची तसेच गेल्या पाच वर्षांत कर्करोगाची तपासणी न झालेल्या नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांची तपासणी केली जात आहे.

गाव व वॉर्ड पातळीवर विशेष आरोग्य पथके

प्रत्येक गाव व वॉर्ड पातळीवर आशा, एएनएम, एमपीडब्ल्यू आणि समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांच्या माध्यमातून विशेष पथके कार्यरत आहेत. या पथकांमार्फत नागरिकांची आवश्यक प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे.

अभियानात उच्च रक्तदाबासाठी रक्तदाब मोजणी, मधुमेहासाठी रक्तातील साखरेची (RBS) तपासणी, महिलांसाठी गर्भाशय मुख कर्करोगाची VIA चाचणी, स्तन कर्करोगासाठी स्तनातील गाठींची तपासणी तसेच तोंडाच्या कर्करोगासाठी तोंडातील विकृती आणि तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे.

संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचाराची सुविधा

तपासणीदरम्यान आजाराचा संशय आढळलेल्या नागरिकांना पुढील निदानासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात येते. आवश्यकतेनुसार मॅमोग्राफी, बायोप्सी, FNAC यांसारख्या पुढील तपासण्या तसेच उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

३० वर्षांवरील नागरिकांनी तपासणी करून घ्यावी

‘लवकर तपासणी, योग्य निदान आणि वेळेवर उपचार’ या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा ३० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात किंवा गावात येणाऱ्या आरोग्य पथकाकडून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा