You are currently viewing सावंतवाडीत लवकरच मोफत ‘आयुष ओपीडी’ सुरू होणार
Oplus_16908288

सावंतवाडीत लवकरच मोफत ‘आयुष ओपीडी’ सुरू होणार

सावंतवाडी नगरपरिषद व गोवा, धारगळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद यांच्यात सामंजस्य करार; आठवड्यातून दोन दिवस ओपीडीची शक्यता

सावंतवाडी : सावंतवाडी शहर आणि परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट दर्जाच्या आयुर्वेदिक उपचारांची सुविधा मिळवून देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद आणि गोवा, धारगळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सावंतवाडीतील रुग्णांना मोफत ओपीडी सेवा, औषधे आणि आवश्यक उपकरणांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून आयुष मंत्रालयाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही ओपीडी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुष मंत्रालयाचे संचालक प्रा. डॉ. प्रदीपकुमार प्रजापती यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून नगरपरिषदेने या ओपीडीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

सुरुवातीला ही ओपीडी आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. यामध्ये इमारतीची आवश्यक व्यवस्था सावंतवाडी नगरपरिषद करणार असून, औषधे व उपकरणे आयुष संस्थेकडून पुरविली जातील. रुग्णांचा प्रतिसाद पाहून भविष्यात बालरोगासह विविध स्पेशालिटी सेवा, पंचकर्म व अन्य विशेष उपचार टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील.

उपजिल्हा रुग्णालयातील जागा अपुरी पडल्याने नगरपरिषदेच्या जागेची निवड करण्यात आल्याची माहिती प्रा. विनायक चकोते यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या आयुष ओपीडीपैकी एक सुविधा सावंतवाडीत सुरू होत असल्याचा अभिमान असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री श्रीपाद नाईक यांच्या सहकार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, धारगळ येथील संस्थेत सिंधुदुर्गातील सुमारे चाळीस टक्के रुग्ण उपचारासाठी जातात.

सावंतवाडीची आयुर्वेदिक परंपरा लक्षात घेता भविष्यात येथे पंचकर्म, योगा सेंटर, वेलनेस सेंटर आणि हेल्थ पार्क विकसित करून आरोग्य पर्यटनाला चालना देण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला. तसेच दोडामार्ग एमआयडीसीतील पन्नास एकर जागेवर आरोग्य सुविधा उभारण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय आमदार केसरकर यांनी सावंतवाडी स्टॉलमुक्त करून व्यापाऱ्यांना पक्की दुकाने देण्याची सूचना नगराध्यक्षांना केली असून, बाजारपेठेसाठी दिलेल्या नऊ कोटी रुपयांच्या निधीतून काम पूर्ण झाल्यावर पार्किंगचा प्रश्न सुटेल, तसेच २२ कोटी रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आयुष मंत्रालयाचे संचालक प्रा. डॉ. प्रदीपकुमार प्रजापती आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थानच्या डीन डॉ. सुजाता कदम यांनी सावंतवाडीत ओपीडी सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सावंतवाडीतील प्रतिसाद पाहून विशेष सेवा वाढविण्यात येतील, असे डॉ. प्रजापती यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी हा निर्णय नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत पालिकेचा आयुर्वेदिक दवाखानाही लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले.

या सामंजस्य कराराच्या प्रसंगी आयुष मंत्रालयाचे संचालक प्रा. डॉ. प्रदीपकुमार प्रजापती, डीन डॉ. सुजाता कदम, प्रा. विनायक चकोते, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा