You are currently viewing चाफा…

चाफा…

 

मी म्हटलं चाफ्याला,

एवढ्या मोठ्या झाडावर,

तू एकटाच कसा फुलला….

पाने साथ सोडून गेली त्याचं,

वाईट नाही वाटत तुला?

 

चाफा हसला,

हळूच पुटपुटला….

“बहरण्याच्या दिवसात,

साथ हवीच असते कोणाला?

बहर मला आलेला,

भावतो प्रत्येकाच्या मनाला.

माझा आनंद कदाचित,

सहन नाही झाला पानाला,

म्हणून तर जळून स्वतःच,

अर्ध्यावर टाकून गेली मला”.

 

मी म्हटलं चाफ्याला,

आता तुझे दिवस,

जातात कसे बोल…

सोबत नाही कुणी,

याची वाटत नाही सल?

 

चाफा गालातच हसला,

मिश्कीलपणे बोलला…..

“रंग माझा मोहक,

गुलाबी त्यावर छटा,

लाल पांढऱ्या रंगांतून,

वारा शोधतो वाटा.

हवेशी मी खेळतो,

पक्षांशी गुजगोष्टी करतो,

सुखदुःख वाटल्याने,

कुठे आनंद कमी पडतो”.

 

मी म्हटलं चाफ्याला,

पुढे तुझे कसे होणार?

साथ सोबती शिवाय,

तू कसा एकटा जगणार?

 

चाफा पुन्हा हसला,

हसत हसतच बोलला……

“अमरत्व कुणा लाभले,

कधीतरी मीही जाणार.

आठवण माझ्या प्रेमाची,

लाल रंगात ठेवणार.

साथ सोडून गेलेली पाने,

नव्याने जन्मा येणार.

सोबत त्यांना देण्याआधी,

मी मातीमोल होणार”.

 

चाफा बोलत राहिला,

मी स्तब्ध होऊन ऐकलं….

चाफ्याचं बोलणं माझ्या,

मनात खोलवर रुतलं….

*”साथ जे देतात त्यांची,

आयुष्यभर ठेवा किमत.

कोण नसतं कुणाचं जगी,

जगण्याची ठेवा हिम्मत”.*

 

(दिपी)✒️

दीपक पटेकर

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 4 =