जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन; सूचनांचे काटेकोरपणे पालन करा
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचा जोर असून नद्या, तलाव, ओहोळ तसेच धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रातील पाणीपातळी व प्रवाहाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळलेला असल्याने नागरिक व पर्यटकांनी नदी, समुद्र, धबधबे, डोंगर-दऱ्या, तलाव व धरण परिसरात विशेष दक्षता घ्यावी. जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडे, नियंत्रण कक्ष, शोध व बचाव साहित्य तसेच विविध प्रशिक्षणांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे ग्राम आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करण्यात आले असून ११० दरडप्रवण गावांमध्ये जाणीवजागृती प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रशासनाकडून सातत्याने पूर्वसूचना व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असतानाही मे २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये १६ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये धरणाच्या पाण्यात बुडून तीन मुलींचा, समुद्रात बुडून पर्यटक व इतर व्यक्तींचा, तसेच मासेमारीदरम्यान मच्छिमारांचा मृत्यू झाल्याच्या घटनांचा समावेश आहे. दि. १७ ऑगस्ट रोजी दोडामार्ग तालुक्यातील घोडगेवाडी-कोनाळ येथे तिलारी नदीचा कॉजवे पार करताना आठ वर्षीय मुलगा व २५ वर्षीय युवक नदीत पडून बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व पर्यटकांनी प्रतिबंधित किंवा धोकादायक ठिकाणी प्रवेश करू नये, खवळलेल्या समुद्रात जाऊ नये, नदीपात्रात प्रवेश टाळावा तसेच पुलावर, कॉजवेवर किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असताना तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘जबाबदार नागरिक – सुरक्षित नागरिक’ आणि ‘जबाबदार पर्यटक – सुरक्षित पर्यटन’ या संकल्पनेचा अवलंब करून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. संरक्षक रेलिंग ओलांडून सेल्फी काढणे, पुराच्या पाण्यातून वाहने चालवणे, पुराच्या पाण्यात उतरणे अथवा अन्य धोकादायक कृती टाळाव्यात. हवामान विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोशल मीडिया व अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या पूर्वसूचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा त्या पसरवू नयेत. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष ०२३६२-२२८८४७, टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन ११२ वर संपर्क साधावा. नागरिकांनी स्वतःची, कुटुंबीयांची तसेच इतरांची सुरक्षितता प्रथम सुनिश्चित करून प्रशासनास सहकार्य करावे.
