सावंतवाडीत काँग्रेसतर्फे गांधी-शास्त्री जयंती उत्साहात
तौकीर शेख यांची जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती; नियुक्तीपत्र देऊन सत्कार
सावंतवाडी
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उभा बाजार येथील ‘जीवन रक्षा’ कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गांधीजींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान तसेच शास्त्रीजींचे ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ हे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी नगरसेवक तौकीर शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रदेश प्रतिनिधी ॲड. दिलीप नार्वेकर आणि जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर यांच्या हस्ते शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे संघटन जिल्ह्यात अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, प्रदेश प्रतिनिधी ॲड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, विनायक ओटवणेकर, अमिदी मेस्त्री, सुमेधा सावंत, आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, बाळा नमशी, प्रदीप चौगुले, आफताब हेरेकर, सुभाष नाईक, नगरसेवक तौकीर शेख, अन्वर खान, पीटर फर्नांडिस, विनायक सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
