महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २६ एप्रिल रोजी डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजवावा
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) ची निवडणूक रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी, बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ११, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग या मतदान केंद्रावर पार पडणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबादारीने पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
ही निवडणूक दि.२६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ११ मध्ये होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ दस्तऐवज सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
१) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेली नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) जर यावर छायाचित्र नसेल तर त्यासोबत अन्य फोटो आयडी पुरवा जोडणे आवश्यक आहे.
२) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले ओळखपत्र (Identity Card).
३) भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी मान्यता दिलेले छायाचित्रासंहित ओळखपत्र.
४) विवाहित महिला मतदारांसाठी जर नाव बदलेले असेल तर नाव बदलल्याबाबतचा अधिकृत पुरावा (शासन अधिसूचना/ गॅझेट) सादर करणे आवश्यक आहे.
मोबाईल आणि कॅमेरा, मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीस व्हिडिओ कॅमेरा वापरण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. मतदना पध्दत, मतदान गुप्त व पारंपारिक पध्दतीने मतपत्रिकेव्दारे घेण्यात येईल.
मतदान प्रक्रिया :- प्रत्येक मतदारास नऊ (९) मते देता येतील. मतदारास ज्या उमेदवारास मत द्यायचे आहे, त्यांच्या नावासमोर (X) अशी खूण त्यांना पुरविण्यात आलेल्या काळ्या बॉल पेनाने करावी अशा महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबदाऱ्याने पार पडावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
००००००००
आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांप्रश्नी आढावा
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.):- सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत तिलारी ते वेंगुर्ला पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर चर्चा झाली. या योजनेसाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव तातडीने पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. या निर्णयामुळे शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, सावंतवाडी येथील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात पुनर्वसन विभाग व इतर आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ग्रामीण भागातील रस्ते विकासालाही प्राधान्य देत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच आणखी नवीन कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश आमदार दीपक केसरकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
वेंगुर्ला तालुका क्रीडा संकुलाच्या विकासावरही भर देण्यात आला. येथे नवीन रनिंग ट्रॅक उभारणे, खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याचबरोबर, सावंतवाडी व दोडामार्ग तालुका क्रीडा संकुलांसाठी प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय हॉल आणि विविध खेळांच्या मैदानांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. अद्ययावत सुविधा देताना बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचाही निर्णय झाला. बांदा तालुका क्रीडा संकुलासाठी तांत्रिक मान्यता घेऊन प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तिलारी पाणीपुरवठा योजनेतून सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन, कुंभार्ली, ब्राह्मणपाट व मळगाव या भागांना पाणीपुरवठा करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
