You are currently viewing विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार : विशाल परब

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार : विशाल परब

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार : विशाल परब

विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समूहगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध प्रशालांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सुमधुर आणि जोशपूर्ण सामूहिक स्वरांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारून गेला.

स्पर्धेचे उद्घाटन बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ल्याचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन बिडकर, साईप्रसाद नाईक, नगरसेविका अॅड. सुषमा खानोलकर, आकांक्षा परब, काजल कुबल, रिया केरकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये,प्रितम सावंत, वृंदा गवंडळकर, प्रा. सुदाम माने, दादा केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल

इयत्ता ५ वी ते ७ वी – प्राथमिक गट

– प्रथम क्रमांक : जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, वेंगुर्ला नं. ३
– द्वितीय क्रमांक : श्री शिवाजी हायस्कूल, तुळस
– तृतीय क्रमांक : जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, आडेली नं. १
– उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक : वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला
– उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक : जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, परबवाडा नं. १

इयत्ता ८ वी ते १० वी – माध्यमिक गट

– प्रथम क्रमांक : आसोली हायस्कूल, आसोली
– द्वितीय क्रमांक : अणसुर-पाल हायस्कूल, अणसुर
– तृतीय क्रमांक : न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा
– उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक : श्री शिवाजी हायस्कूल, तुळस
– उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक : वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला

स्पर्धेचे पारितोषिक वितरण युवा नेते विशाल परब आणि नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. देशभक्ती ही केवळ स्वातंत्र्य दिनापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांच्या रूपाने रुजली पाहिजे. समूहगीतासारख्या सांघिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना एकत्रितपणे काम करण्याची वृत्ती, शिस्त, आत्मविश्वास, सहकार्य आणि नेतृत्वगुण शिकायला मिळतात.

“या स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी आमच्यासाठी विजेताच आहे. व्यासपीठावर उभे राहून देशभक्तीपर गीत सादर करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास हीच त्यांची मोठी उपलब्धी आहे,” असे सांगत त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

तालुक्यातील विद्यार्थ्यांना भविष्यात आणखी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विशाल परब मित्रमंडळ आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात येईल. आगामी काळात या स्पर्धेचे जिल्हास्तरीय आयोजन करण्याचा मानस असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही विशाल परब यांनी सांगितले.

या स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल त्यांनी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी अशा विधायक आणि संस्कारक्षम उपक्रमांना भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

स्पर्धेचे परीक्षण शांताराम आसोलकर आणि भास्कर मेस्त्री यांनी केले. गीतांची निवड, स्वर-ताल, समूहातील सुसूत्रता, सादरीकरण, भावभावना आणि एकूण प्रभाव या विविध निकषांच्या आधारे त्यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गोविंद धुरी यांनी मानले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महेश राऊळ, विवेक तिरोडकर, सानिया वराडकर, प्रज्वल परुळकर, रोहित गडेकर, प्रा. प्रियांका प्रभू आणि धनंजय साळवी यांनी विशेष मेहनत घेतली.ही स्पर्धा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी उपक्रम ठरली.

प्रतिक्रिया व्यक्त करा