मुंबई : कोकणातील उद्योजक, नवउद्योजक तसेच लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या शासन स्तरावरील विविध समस्या ताकदीने मांडून त्यांचा पाठपुरावा करून त्या वेळेत मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे नवनिर्वाचित कोकण विभागीय उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या नुकत्याच पार पडलेल्या द्विवार्षिक निवडणुकीत चेंबरचे बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष श्री रविंद्र माणगावे यांच्या नेतृत्वाखालील एकता पॅनेलमधून राज्यभरातील सर्व विभागांतून सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारण्याचा सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडला. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती मा. राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. संतोष राणे यांनी कोकण विभागीय उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
डॉ. राणे म्हणाले, कोकणातील उद्योजकांना विशेषतः सुरळीत वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न भेडसावत असून त्यामुळे अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. अशा सर्व महत्त्वाच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील.
ते पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असला तरी गेल्या तीन दशकांत अपेक्षित वेगाने पर्यटन विकास झालेला नाही. त्यामुळे शासन आणि चेंबरच्या संयुक्त सहकार्याने कोकणच्या शाश्वत विकासासाठी एक व्यापक रोडमॅप तयार करून त्याची निर्धारित वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी चेंबर आग्रही राहणार आहे.
यावेळी सकाळच्या सत्रात नवनिर्वाचित समितीला मार्गदर्शन करताना राज्याचे उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांनी उद्योग विभाग आणि महाराष्ट्र चेंबर भविष्यात हातात हात घालून उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात चेंबर, उद्योजक आणि शासन यांच्या संयुक्त बैठका आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
बदलत्या उद्योगनीतीचा विचार करून उद्योजकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेठ वालचंद एक्सीलन्सी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
या पदभार स्वीकार समारंभाला मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. औद्योगिक क्षेत्रातील नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी राज्यातील उद्योजकांनी सज्ज राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चेंबरचे अध्यक्ष श्री रविंद्र माणगावे आणि त्यांच्या नव्या टीमने शासनाशी सकारात्मक समन्वय ठेवून काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत चेंबर आणि शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी कोकण विभागातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा तसेच उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष श्री रविंद्र माणगावे यांनी चेंबरच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागाने आतापर्यंतपेक्षा अधिक प्रभावी कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत डॉ. संतोष राणे यांच्या अभ्यासू आणि दमदार नेतृत्वाखाली कोकण चेंबरचे कार्य निश्चितच लक्षवेधी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या पदभार ग्रहण सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नवनिर्वाचित कौन्सिल सदस्य श्री राजन नाईक, ॲड. नकुल पार्सेकर, श्री विजय केनवडेकर, श्री कुणाल वरसकर तसेच ट्रस्ट बोर्डचे चेअरमन श्री आशिष पेडणेकर उपस्थित होते.
