You are currently viewing करुळमध्ये शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून; आठ तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला

करुळमध्ये शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून; आठ तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला

करुळमध्ये शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून; आठ तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला

सदानंद कदम यांचा दुर्दैवी मृत्यू; पोलीस, महसूल, आपत्ती व्यवस्थापन, सह्याद्री जीव रक्षक टीम व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांना यश

वैभववाडी | प्रतिनिधी :
करुळ गावठण ब येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय ६०) यांचा शेतात जात असताना पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावरील करुळ-जामदारवाडी सीमेवरील नदीपात्रात तब्बल आठ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, सह्याद्री जीव रक्षक टीम आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सदानंद कदम हे कामानिमित्त शेतात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने घराजवळील नदीपात्र ओलांडताना ते पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सह्याद्री जीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून सकाळपासून शोधमोहीम सुरू केली. नदीला मोठा पूर असल्याने शोधकार्यात अडथळे येत असतानाही जीव रक्षक पथकाने दोरी व लाईफ जॅकेटच्या साहाय्याने शोधकार्य सुरू ठेवले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, तहसीलदार सूर्यकांत पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच एनडीआरएफ पथकाशीही संपर्क साधण्यात आला.

दुपारी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान करुळ-जामदारवाडी सीमेवरील नदीपात्रातील झुडपांमध्ये सदानंद कदम यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला व शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.
शोधमोहीमेदरम्यान महसूल, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि सह्याद्री जीव रक्षक संस्थेच्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा