दोडामार्गात महावितरणविरोधात संतापाचा उद्रेक; भर पावसात कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन
तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठा, मोबाईल नेटवर्क, उद्योग-व्यवसाय ठप्प – जीर्ण वीजयंत्रणेच्या नूतनीकरणाची मागणी
दोडामार्ग
मुसळधार पावसाला सुरुवात होताच दोडामार्ग तालुक्यातील महावितरणचा नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. तालुक्यातील अनेक गावे गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंधारात असून, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्राहकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत भर पावसात ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत विविध प्रश्नांचा जाब विचारला.
गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांतील मोबाईल नेटवर्क बंद पडल्याने संपर्क व्यवस्था कोलमडली आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम झाला आहे.
यावेळी नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या गाजावाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एका बाजूला स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आधुनिकतेचा प्रचार केला जातो, मात्र दुसऱ्या बाजूला मूलभूत पायाभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्ती झाल्याचे सांगितले जाते, मग पहिल्याच पावसात वीज का खंडित होते?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे गणेशमूर्ती कलाकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचेही आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. तसेच जीर्ण झालेले वीजखांब, लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या आणि क्षमतेबाहेर काम करणारे ट्रान्सफॉर्मर यामुळे किरकोळ पावसातही वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगण्यात आले. हा दोष स्थानिक कर्मचाऱ्यांचा नसून वरिष्ठ पातळीवरील दुर्लक्षाचा परिणाम असल्याचे मत व्यक्त करत, वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून जीर्ण वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करावे, नवीन वीजखांब उभारावेत, अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवावेत तसेच साटेली-भेडशी परिसरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून त्यांची स्थानिक पातळीवर नियुक्ती करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
साटेली-भेडशीसह संपूर्ण तालुक्यातील वायरमन आणि अधिकारी नागरिकांचे फोन उचलत नसल्यानेही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “महावितरण ग्राहकांकडून वीज बिल वेळेत आणि सक्तीने वसूल करते, मग नियमित व सुरळीत वीजपुरवठा का देत नाही? वीज ही चैनीची वस्तू नसून नागरिकांचा मूलभूत हक्क आहे,” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.
या आंदोलनात सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक गवस, शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस, सुभाष दळवी, प्रकाश देसाई, संदीप गवस, संदेश वरक, प्रकाश गवस, भूषण सावंत, महिला ग्राहक श्रीमती कुंदेकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. वीजपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
