डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून सिंधुदुर्गला ३९.९६ कोटींचा निधी
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; १५६ गावांत सौर हायमास्ट दिवे उभारणार
सावंतवाडी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी तब्बल ३९ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ७ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.
या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्या तसेच गावांमध्ये विविध विकासकामे राबविण्यात येणार आहेत. या समाजघटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावर अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
१५६ गावांमध्ये सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी
मंजूर निधीचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागाला होणार असून, जिल्ह्यातील सुमारे १५६ गावांमध्ये सौर हायमास्ट दिवे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक वस्त्या आणि परिसरातील अंधार दूर होऊन नागरिकांना सुरक्षित व प्रकाशमान वातावरण उपलब्ध होणार आहे. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार ही सर्व विकासकामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
विकासाला मिळणार नवी चालना
या भरीव निधीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. दळणवळण, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांच्या दृष्टीने सौर हायमास्ट दिवे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांमधून राज्य सरकार तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले जात आहे.
