काही लोक असे असतात की एका क्षेत्रात आपला विकास करतात. काही मात्र याला अपवाद असतात. या अपवादाच्या यादीत मला श्यामल सराडकर या डॉक्टरचा उल्लेख करावा लागेल. गुरुवार दिनांक दि. 18 जून रोजी नागपूरला त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे. डॉक्टरांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि तेही कवितेचे .ही थोडी आगळी वेळळीच गोष्ट आहे. डॉक्टर कविता लिहितात असे नाही. पण सहसा लोकांसमोर व्यक्त होत नाहीत. पुस्तके प्रकाशित करीत नाहीत. त्यापैकी बहुतांश आपल्या व्यवसायात मग्न असतात. काव्यसंग्रह प्रकाशित करणे वगैरे त्यांच्या ध्यानीमानी नसते. म्हणूनच श्यामल त्याला अपवाद आहे.
श्यामल नुसतं कविता लिहून थांबला नाही तर त्याने त्याची लेखणी गद्य लिखाणाकडे वळविली.तो नुसत्या गद्यपद्य या यादीतून बंदिस्थ झाला नाही तर संगीत भाषणे व्याख्याने यामध्येही त्याने नाव चांगले नाव कमाविले आहे. सर्वमान्य नियतकालिकातून त्याची लेखमाला प्रकाशित झाली आहे. एखाद्या प्रसिद्ध नियतकालिकाने त्याचे नियमित लेख छापणे म्हणजे ते एक सिद्धहस्त असल्याचे प्रमाणपत्रच आहे. व्याख्यानाच्या बाबतीत तो मागे नाही आणि संगीत तर त्याच्या जीवनाचा अविभाज्य अंगच आहे .संगीत आणि श्यामल दोघांना अल्लग करता येणार नाही .निदान या जन्मात तरी इतकी घट्ट मिठी त्याने संगीताला मारली आहे.
अरिस्टॉटलने एक विरेचनाचा सिद्धांत सांगितलेला आहे आणि त्यावर त्याने संगीताचा योग्य वापर केला तर भावनात्मक एकात्मता साधून दुःख किंवा दुःखाचा भार हलका होण्यास मदत करते .असे या जगप्रसिद्ध तत्त्ववेक्त्यांने म्हटले आहे आणि ते खरंही आहे. अनेक वेळा संगीत किंवा गायनाच्या ओळी नकळत आपल्या कानावर पडतात आणि त्या आपल्याला समाधान देऊन जातात. तृप्त करून जातात.तेच श्याम
मलच्या बाबतीत घडले आहे.
श्यामल आमचे जिवलग मित्र डॉ.बबन सराडकर यांचा मुलगा. बबन आणि मी म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. श्यामलच्या जन्मापासून तर आतापर्यंतचा सर्व प्रवासाचा मी साक्षीदार आहे. मोठा डॉक्टर कवी गायक स्तंभलेखक वक्ता असे पाच सन्मान त्याच्या नावाशी आहेत.
पण अहंकाराचा लवलेशही त्याला शिवलेला नाही. म्हणून माणूस जगणे माणूस म्हणून बोलणे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हे तत्व त्याला गवसले आहे. म्हणूनच आज त्याच्या पिढीमध्ये नव्हे तर त्याच्या अगोदरच्या पिढीमध्येही त्याचा चांगला सन्मानजनक नावलौकिक आहे.
शयामलचे व्यक्तिमत्व घडले ते त्याचे वडील बबन सराडकर यांच्यामुळे .वडील कवी रसिक गायक वादक लेखक संपादक या सर्व क्षेत्रात होते .चांगले कवी होते व आहेत. चांगले गायक ही आहेत . विशेष म्हणजे संगीताचे ज्ञान आहे. त्याचे प्रतिबिंब श्यामलच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये पडले .त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत पाठविले नाही .चौथ्या वर्गापर्यंत त्याची घरीच तयारी करून घेतली .पण इतकी चांगली की त्याने आमच्या सारख्या प्राध्यापकांच्या मुलांना मागे टाकले. प्राथमिक शाळेत न गेलेला मुलगा डॉक्टर होतो संगीतकार होतो गायक होतो कवी होतो वक्ता होतो लेखक होतो हे खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही प्रगती साधीसुधी नक्कीच नाही. त्यामुळे श्यामल सारखे तरुण फारच क्वचित सापडतात. इतक्या कलांचा समन्वय असलेला तरुण माझ्यातरी अद्याप संपर्कात आलेला नाही.
श्यामलला पाहिल्या बरोबर हा काहीतरी आगळा वेगळा आहे असे वाटते .त्याचे केस त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्व त्याचा हसरा चेहरा त्याचे बोलके डोळे हे सगळे तुमच्यावर छाप टाकून जातात. नेपोलियन बद्दल म्हणतात ते आले त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले. हेच समीकरण श्यामलला लागू होते.
जिथे जाईल तिथे तो काहीतरी वेगळा आहे असे जाणवते. पण हे वेगळेपण असले तरी आणि चार-पाच कलांचा संगम त्याच्या ठिकाणी झालेला असला तरी त्याचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. पाय जमिनीवर ठेवण्यासाठी खूप मोठी ताकद लागते. नाहीतर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कलावंत हवेतच असतात पण त्या मृगजळ हवेचा स्पर्श शामलला झाला नाही. हे तितकेच खरे आहे.
गुरुवार दि.18 ला सायंकाळी पाच वाजता नागपूरच्या शंकर नगर चौकातील वोकार्ट हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बापूराव धनवटे सभागृहात
श्यामलचा मूर्त अमूर्त या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे. अमरावती नागपूरच्या ज्ञानपथ या प्रकाशनाने हा काव्यसंग्रह छापून तयार ठेवला आहे. ज्ञानपथचे नाव चांगलेच दर्जेदार प्रकाशकाच्या यादीत आहे. सुशील व सचिन सुरळकर या दर्जेदार प्रकाशकांनी एका दर्जेदार कलावंताची कवितेची कवीची प्रतिभा ओळखून त्याचा कवितासंग्रह प्रकाशित करण्याची ऑफर श्यामलला दिली आहे हे श्यामलचे समृद्ध सांस्कृतिक कौशल्यच आहे.
आपण बोलले पाहिजे मोजकेच बोलले पाहिजे मोजकेच गाईले पाहिजे आणि मोजकेच व्यक्त झाले पाहिजे या बाराखडीमध्ये श्यामल बसतो. मोनालिसा एकच चित्र आहे .पण गेल्या कित्येक वर्षापासून ते जागतिक चित्रकारांच्या यादीत होते आहे आणि राहिलही. एखादा कवी एखादा लेखक एखादी कलाकृती निर्माण करतो त्यानंतर त्याची निर्मिती थांबते. पण त्याने निर्माण केलेली एकच कलाकृती संपूर्ण साहित्यिक जगाला मोहिनी घालते. आपण उद्धव ज.शेळके यांची धग घेऊ या शिवाजी सावंत यांची मृत्युंजय घेऊ या भालचंद्र नेमाडे यांची कोसला घेऊ या .ह्या सर्व कलाकृती रसिकांच्या मनावर दीर्घकाळ टिकून असलेल्या कलाकृती आहेत आणि राहणारही आहेत.
रहे ना रहे हम
महका करेंगे
या यादीत या कलाकृती जाऊन बसतात. कलाकृती अशाच असल्या पाहिजेत. याचा अर्थ इतरांनी लिहू नये असे नाही. ते लिहीत राहतील. तेव्हाच कुठेतरी भविष्यात संपन्न होतील.
श्यामल लिहीत राहिला. गात राहिला. व्याख्याने देत राहिला. खेळत राहिला . शामल संगीतात रमत राहिला हे खरे जीवन आहे. तुम्ही भरपूर पैसा कमावला याला फार अर्थ नाही. अर्थाशिवाय संसार चालत नाही. हे खरेच आहे .परंतु केवळ अर्थ म्हणजे संसार नाही. जेव्हा जीवनाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा खऱ्या अर्थाची प्राप्ती होते. ती कला शामलने साधली आहे.
आमची आता सत्तरी उलटली आहे .अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे .पण श्यामल सारखी समृद्धता आमच्याही ठिकाणी अजून आलेली नाही. त्याला काही कारणे निश्चितच असतील. पण शामल भाग्यवान आहे की त्याला बबन सराडकर सारखा कवी गायक संगीत तज्ञ पिता मिळाला आणि वर्षाताई सारखी त्याला प्रोत्साहन देणारी त्याची संगोपन करणारी त्याच्यासाठी सावलीसारखी जपणारी मातोश्री मिळाली. जीवनात अजून काय पाहिजे असते.
माझ्या काही मित्रांची मुले परदेशात मोठ्या मोठ्या पगारावर आहेत. पण माझ्या त्या मित्रांची अवस्था वाईट आहे. मुले परदेशात बाप वनवासात अशी परिस्थिती आहे. सराडकर परिवार तसा भाग्यवान परिवार आहे. मुलगा काय कमावतो याला अर्थ नाही. पण मुलगा कुटुंबात राहतो. परिवारात राहतो. आई-वडिलां सह राहतो. त्यांची काळजी घेतो. त्यांच्या मित्रांची काळजी घेतो .यामध्ये खऱ्या अर्थाने अर्थार्जन आहे.. पैसा भरपूर असला म्हणजे अर्थाजन होते असे नाही. या अर्थाजनाच्या कल्पनेला शामलने छेद दिला आहे आणि म्हणूनच शामल आज संगीत गायन कविता लेखक व वक्ता म्हणून सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे.
तो असाच बहरत राहावा असाच दरवळत राहावा अशी मनोमन प्रार्थना आहे. त्याने त्याचे व्यक्तिमत्व असे विकसित केलेले आहे की नकळत बहरणे दरवळणे हे त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग झालेले आहे. अशा शामलला त्याच्या कवितासंग्रहाच्या निमित्ताने हृदयापासून शुभेच्छा.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती
9890967003
