प्राधिकरण निगडी –
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे प्राधिकरण विभागातील १९ शाळांमधील १० वी व १२ च्या विद्यार्थ्यांचे तसेच संघातील सभासदांच्या नातवंडांचे गुणगौरव समारंभ दिनांक १४ जून रोजी, निगडी येथील माऊली मंदिरात संपन्न झाला.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात, संघातर्फे वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा लेखाजोखा सादर केला.त्याचवेळी संघातील सभासदांच्या वयाला ८१ वर्षे पूर्ण झाली असतील त्यांचा यावर्षीपासून सत्कार करण्यात येईल अशी घोषणा केली.
प्रमुख वक्ते, ज्ञानदीप विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. सुबोध गलांडे यानी सहज सोप्या आणि ओघवत्या गोष्टीतून मुलांना मार्गदर्शन केले. संयमाने संकटावर कशी मात करावी हे शिवाजी महाराजांच्या कथेमधून मार्मिकपणे सांगितले.
या कार्यक्रमात प्राधिकरण विभागातील १९ शाळा, कॉलेजमधील १० वी व १२ वीत प्रथम आलेल्या ३९ विद्यार्थ्यांचे सत्कार श्री सुबोध गलांडे, श्री. बाळा शिंदे व सौ. सरिता साने यांच्या हस्ते करण्यात आले.
संघातील सभासदांच्या एकूण २६ नातवंडांचे सत्कार , अध्यक्ष श्री चंद्रशेखर जोशी, सौ अलका बेल्हेकर आणि दिलीप गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री व सौ वैशाली भांडारकर यांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून आरोही सुनील धोत्रे व साक्षी अरुण कापडे यांचे सत्कार प्रमुख वक्त्याच्या हस्ते करण्यात आले.
प्राधिकरणातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठांचे मानसपुत्र श्री बाळा शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी निखिल कांबळे यांनी गुण कमी पडले तरी चालतील पण चांगले नागरिक बनूया असे मत व्यक्त केले. विद्यार्थिनी, रितीमा कुलकर्णी हिने यशाचे श्रेय आपल्या आजी आजोबा व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाला दिले सुनिता संदीप पनमंद किर्ती विद्यालय, छाया संभाजी कुंभार पूनावाला शाळा, पांडुरंग गरजे मूकबधिर शाळा या शिक्षकांनी व्यक्त केलेल्या मनोगतात, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा कोळपकर, सुनील दुर्गे, सुनिता यन्नुवार, सुभाष बोरोले यांनी केले.
