गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वैभववाडीत लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग
पत्रकार समितीच्या गुणगौरव सोहळ्यात सभापती सिद्धेश रावराणे यांची घोषणा
वैभववाडी | प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत मिळविलेल्या दैदीप्यमान यशाचा अभिमान वाटतो. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून लवकरच स्पर्धा परीक्षा वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, अशी घोषणा पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी केली.
वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमास तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपसभापती साची कोलते, पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे तसेच पंचायत समितीचे अधिकारी संतोष टक्के, शिक्षक संदीप शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सिद्धेश रावराणे म्हणाले, तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पत्रकार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. पत्रकार समितीचा हा उपक्रम स्तुत्य असून “तालुक्यासाठी आपण देणं लागतो” या भावनेतून प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण परिस्थितीअभावी थांबू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
तहसीलदार सूर्यकांत पाटील म्हणाले, “परिस्थिती कशीही असो, कष्ट श्रीमंत असले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे स्वरूप समजून अभ्यास केला पाहिजे. मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आज या पदापर्यंत पोहोचलो आहे. तुम्ही मिळवलेले यश कौतुकास्पद असून त्यात सातत्य राखा.”
यावेळी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपसभापती साची कोलते तसेच प्रकाश काळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास किशोर जैतापकर, एकनाथ पवार, उज्वल नारकर, नरेंद्र कोलते, मारुती कांबळे, मोहन पडवळ, महेश रावराणे, प्रा. एस. एन. पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल नारकर यांनी केले. प्रास्ताविक मारुती कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एन. पाटील यांनी केले.
