You are currently viewing जळगावात २६ फेब्रुवारीला रंगणार राज्यस्तरीय गझल मुशायरा

जळगावात २६ फेब्रुवारीला रंगणार राज्यस्तरीय गझल मुशायरा

पुस्तक प्रकाशन आणि गझल लेखन कार्यशाळाही होणार

 

जळगाव (गुरुदत्त वाकदेकर) :

गझल मंथन साहित्य संस्था आयोजित महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा राज्यस्तरीय गझल मुशायरा रविवार, दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगावात रंगणार आहे. तसेच एक दिवसीय नि:शुल्क मराठी गझल लेखन कार्यशाळा व गझलसंग्रह आणि काव्यसंग्रहाचे प्रकाशन देखील होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गझलकार ज्ञानेश पाटील राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून सांगलीचे जिल्हा न्यायाधीश पुरुषोत्तम भाऊराव जाधव उपस्थित राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून जळगांव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. केतन जयदेव ढाके उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या सत्रात होणाऱ्या गझल लेखन कार्यशाळेत नवोदित गझलकारांना सुप्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, सुप्रसिद्ध गझलकार निलेश कवडे, सुप्रसिद्ध गझलकार शांताराम (शाम) खामकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन गझलकार यशवंत मस्के करतील.

कार्यशाळेनंतर अध्यक्ष डॉ. ज्ञानेश पाटील मार्गदर्शन करतील. तसेच स्वागताध्यक्ष पुरुषोत्तम जाधव हे मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर प्रातिनिधिक गझलसंग्रह ‘गझलयात्री भाग २’ आणि ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या ‘मनाच्या नजरेतून’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. दुपारच्या स्नेहभोजनानंतर दुसऱ्या सत्राला आरंभ होईल. त्यात नामांकित गझलकारांचा राज्यस्तरीय गझल मुशायरा होईल. या मुशायऱ्यात डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ. कैलास गायकवाड, निलेश कवडे, शांताराम खामकर (शाम), अमोल शिरसाट, हेमलता पाटील, जयवंत वानखडे, वसुदेव गुमटकर, शिवाजी साळुंखे, अनिता खैरनार, दिगंबर खडसे आदी गझलकार सहभागी होतील. गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन गझलकार रत्नाकर जोशी करतील. हा कार्यक्रम जळगाव येथील वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. गझल लेखन शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या (88065 44472) या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाॅटसॲपद्वारे नाव नोंदणी करावी. गझल रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धी प्रमुख भरत माळी, खानदेश उपविभाग प्रमुख ॲड. मुकुंदराव जाधव आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा