फोंडाघाटमध्ये तुफान पावसानंतर नागरिकांचा संताप
अर्धवट पुलाचे काम, रस्त्यावर चिखल आणि पाणी साचल्याने अपघाताची भीती; सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देणार
फोंडाघाट :
फोंडाघाट परिसरात रात्री झालेल्या तुफान पावसामुळे नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. घाटातील पुलाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. सध्या फक्त फोंडाघाट मार्ग सुरू असल्याने सर्व वाहतूक याच घाटातून सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर येत्या काळात रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. या संदर्भात आज सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी आणि गटनेते संजय आग्रे हे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देणार आहेत.
