पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार
सिंधूदर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचे आज भूमिपूजन; पत्रकारांचे जिल्हास्तरीय स्नेहसंमेलन आणि गुणवंत पाल्यांचा होणार गौरव
सिधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘दर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पा’चे भूमिपूजन शनिवारी १७ मे रोजी दुपारी ४ वाजता सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे.
सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने आयोजित या सोहळ्यास खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, मराठी पत्रकार संघटनेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे पत्रकारांचे जिल्हास्तरीय स्नेहसंमेलनही आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनात पत्रकारांच्या पाल्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात येणार असून, दहावी आणि बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. संबंधित पत्रकारांनी आपल्या पाल्यांची नावे त्वरित जिल्हा पत्रकार संघाकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध लोककला व गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पत्रकारांसह त्यांच्या पत्नी आणि मुलांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कला सादर करण्यास इच्छुकांनी आपली नावे आगाऊ नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास आणि स्नेहसंमेलन कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर आणि गृहनिर्माण प्रकल्पाचे चेअरमन संतोष राऊळ यांनी केले आहे.
