You are currently viewing बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व/ निबंध स्पर्धा संपन्न

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व/ निबंध स्पर्धा संपन्न

महान व्यक्तीचे विचार समाजाला नैतिक अधिष्ठान देतात –  उमेश गाळवणकर

 

कुडाळ :

 

“महान व्यक्तीचे विचार, त्यांच्या विचारांचा वारसा समाजाला- तरुण पिढीला नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून देतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या जीवन चरित्रातून सामाजिक बांधिलकी व देशप्रेमाचे धडे मिळतात. असे उद्गार बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले. ते बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी वर्ष व महिला बी. एड. महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा- निबंध स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “कोकणातील बॅरिस्टर नाथ पै ही संसदीय राजकारणातील एक महान विभूती होती. त्यांचे जीवन चरित्र, त्यांची राजकीय कारकीर्द, लोकोद्धाराची तळमळ तरुण पिढीने या स्पर्धेच्या निमित्ताने वाचली तरी आजच्या पिढीला ते स्फुर्तीदायक ठरतील . लोकनेता कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणजे बॅ.नाथ पै. त्यांच्या चरित्राला- विचारांना या निमित्ताने उजळा मिळेल, ते आचरणात आणण्याची उर्मी तरुणांच्या मनात जागृत झाली तरी पुरेसे आहे. या स्पर्धांच्या निमित्ताने रोडावत चाललेल्या वाचन संस्कृतीला बळ मिळेल “.असे सांगत या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, महिला बी.एड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, सीबीएससी सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे , नर्सिंग महाविद्यालयाच्या उप प्राचार्य कल्पना भंडारी, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्रगती शेटकर इत्यादी उपस्थित होते. परीक्षकांच्या वतीने बोलताना डॉक्टर गणेश मर्गज यांनी “बॅ. नाथ पै शिक्षण संस्था शिक्षणिक -सामाजिक बांधिलकीच्या नात्याने करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करीत समाजाला आदर्शभूत असलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांच्या विचारांचा जागर या स्पर्धेच्या निमित्ताने होत असतो; ते विचार सर्व दूर पसरतात. त्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नाथ पै यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे त्यांचे शिलेदार मधु दंडवते, फर्नांडिस यांच्या कार्याचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं. प्रा मयूर शारबिद्रे यांनी सुद्धा ” बॅ. नाथ पै यांचे लोकसभेतील कार्य, वाक्पटुत्व, अभ्यासूपणा, लोकोद्धाराच्या तळमळीतून बोलणारे त्यांचे सर्वस्पर्शी भाषण व कोकणचे नाव ज्यानी जगभरामध्ये नेलं; त्या बॅ. नाथ पै यांच्या चरित्राची तरुण पिढीला ओळख होण्यासाठी या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे तसेच आयोजकांचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी बॅ. नाथ पै यांच्या जीवनावर आधारित – १)सामान्य जनतेचे कैवारी बॅ.नाथ पै २)नाथ पै आणि लोकचळवळ हे वक्तृत्व स्पर्धेचे विषय – तर १) थोर संसद पटू बॅ.नाथ पै व २) लोकनेते बॅ.नाथ पै हे निबंधाचे विषय असलेल्या स्पर्धेमध्ये पारितोषक- प्रथम क्रमांक ३००० रुपये रोख व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक २००० रुपये रोख व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रोख रु. १००० व सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व त्यानंतर उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी रोख रु ५०० रुपयांची बक्षिसे व  प्रमाणपत्र अशी बक्षीसं ठेवण्यात आली होती.

वक्तृत्व स्पर्धेमध्ये – प्रथम क्रमांक प्रेरणा सचिन खेडेकर, द्वितीय क्रमांक – सानिका दत्ताराम जाधव (बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय), तृतीय क्रमांक- प्रणिता प्रदीप कोटकर ,तर उत्तेजनार्थ पारितोषिक-१) पार्वती धोंडी कोदे, २)कृपा ऊत्तम म्हाडदळकर,३) सौ.प्रचिती पंढरीनाथ सावंत यांना, तर खुल्या निबंध स्पर्धेमध्ये- प्रथम क्र.निता नितीन सावंत, द्वितीय क्रमांक – किरण मोतिराम सावंत, तृतीय क्रमांक – सत्यवान बुधाजी कदम, तर उत्तेजनार्थ पारितोषिके – १) प्रचिती पंढरीनाथ सावंत २) श्रुती श्रीधर शेवडे यांनी प्राप्त करून यश संपादन केले. (वक्तृत्व स्पर्धेसाठी गणेश मर्गज व प्रा. मयुर शारर्बीद्रे यांनी तर निबंध स्पर्धेसाठी प्रा.संतोष वालावलकर व प्रा. परेश धावडे यांनी परीक्षण केले.) यशस्वी स्पर्धकांना एका विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा कशाळीकर, प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज, तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रणाली मयेकर यांनी मांनले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =