*’आनंदाचा बटवा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न*
पिंपरी
”आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहातून वाचकांनी आनंद घ्यावा आणि इतरांनाही आनंद वाटून जीवनाचा प्रवास समाजाचे ऋण फेडत समाधानाकडे वाटचाल करणारा ठरावा!’ असे विचार डाॅ. संजय जगताप यांनी तारांगण सभागृह, सायन्स पार्क, चिंचवड येथे व्यक्त केले. कवी संजय होनकळस लिखित आणि काव्यमित्र संस्था आयोजित ‘आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. संजय जगताप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे संस्थापक – अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, संत एकनाथमहाराज यांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्करमहाराज गोसावी, कवी संजय होनकळस यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय कवी, साहित्यिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व रसिक यांची सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
डाॅ. संजय जगताप पुढे म्हणाले की, ‘आनंदाच्या वाटा, आनंदाचे जिन्नस, २१ जून योग दिवस, बालभारती, ग्रंथालय, सराव, पुस्तक, संमेलन, कलाकार, कलेचं ऋण, संगीत, शब्दार्थ, पर्यटण, कोकण, सौभाग्यवती, स्त्रीशक्ती, ईश्वरानुभूती, साक्षात्कार अशा वैविध्यपूर्ण कवितांनी हा ‘आनंदाचा बटवा’ ओतप्रोत भरलेला असून तो आबालवृद्धांना निश्चितच आनंददायक ठरेल!’ अन्य मान्यवरांनी मनोगतातून साहित्य, समाजकार्य आणि संस्कारमूल्ये जपणाऱ्या अशा उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले; तसेच साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून युवा पिढीने वाचनसंस्कृती जोपासावी, असे आवाहनही केले.
यावेळी कवी संजय होनकळस यांनी आपल्या मनोगतातून, ‘आयुष्याचे दालन फुलवण्यासाठी मला गवसलेला आनंद आणि समाधान रसिकांनाही लाभावे या उद्देश्याने मी कवितालेखन करीत गेलो. त्या कविता आज पुस्तकरूपाने मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होत आहेत, याचा आनंद अवर्णनीय आहे!’ अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या संयोजनात हरिनाथ कांबळे, संभाजी दंतेराव, अजितकुमार जमदाडे आणि काव्यमित्र संस्थेच्या कार्यकारिणीने सहकार्य केले. सुप्रिया जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले. काव्यमित्र संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
