संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व आमचे जिवलग मित्र श्री दिलीप स्वामी यांची अकोला येथे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन करून अमरावतीला परत आलो. रात्र बरीच झाली होती. मध्यरात्री वर्तमानपत्र व्हाट्सअप वर आलीत आणि ते वाचताना एक सुखद बातमी वाचण्यात आली. ती म्हणजे आमचे जिवलग मित्र श्री अरुण कुमार डोंगरे यांची अमरावती महसूल विभागाच्या राज्य हक्क सेवा आयोगाच्या आयुक्तपदी निवड झाली. खूपच आनंद झाला. इतक्या रात्री फोन करणे प्रशस्त वाटले नाही म्हणून साहेबांना संदेश टाकला. पण इतक्या रात्री देखील साहेबांनी तो संदेश पाहिला. हे कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असतो त्याचे प्रत्यंतर त्यावेळेस आले.
श्री अरुण कुमार डोंगरे यांचे अमरावती शहराचे जवळचे नाते आहे. या अमरावती विभागात ते विविध पदावर कार्यरत राहिले. एका अर्थाने ते अमरावतीकरच झाले. या मोठ्या कालावधीमध्ये अमरावती शहरांमध्ये त्यांचा भरपूर मित्रपरिवार तयार झाला. हसतमुख चेहरा तेजस्वी तत्पर व तपस्वी देहबोली यामुळे त्यांनी अल्प काळात लोकांची मने जिंकले. त्यांना जो माणूस भेटला तो त्यांनी आपलासा करून घेतला. त्यामुळे त्यांचा गोतावळा आज फार मोठा आहे.
एक आय ए एस ऑफिसर जेव्हा लोकांमध्ये मिसळतो लोकांमध्ये राहतो आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रशासन लोकाभिमुख होते. डोंगरे साहेबांना ते कौशल्य साधले आहे. आणि म्हणूनच त्यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम असो मुलीचा साक्षगंध असो ही मुलीचे लग्न असो किंवा इतर कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला त्यांचा महाराष्ट्रातील पूर्ण गोतावळा ताकतीनिशी उभा राहतो.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर युग निर्माता नावाचे नाटक बसविले होते. 1998 चा तो काळ. डॉ. पंजाबराव देशमुख यांची जन्मशताब्दी होती. मी त्या समितीचा सचिव होतो.अमरावतीला श्री ह रा कुलकर्णी हे आयुक्त होते. ते आमच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले. श्री अरुण डोंगरे साहेब तेव्हा दारव्हयाला उपविभागीय अधिकारी होते .ते म्हणाले एक कार्यक्रम आमच्या दारव्ह्याला पण ठेवा. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही दारह्याला युग निर्माता नाटकाचा प्रयोग केला आणि तो अतिशय चांगल्या रीतीने संपन्न झाला. विशेष म्हणजे साहेब प्रयोगाला तर थांबलेच. परंतु आमची सर्वांची जेवणे होईपर्यंत व आमची बस अमरावतीला रवाना होईपर्यंत हे आमच्याबरोबर होते. सर्व कलावंतांनी त्यांच्या या आपुलकीची नोंद घेतली.
साहेब नांदेडला जिल्हाधिकारी असताना आम्ही साहेबांना भेटायला गेलो. अर्थातच माझी नांदेडची मित्रमंडळी म्हणाली आम्ही पण भेटायला येतो तुमच्या निमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांची आमची भेट होईल. मी साहेबांना आम्ही सात-आठ लोक येणार आहोत अशी कल्पना दिली. सायंकाळी आम्ही साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. साहेबांनी व वहिनीसाहेबांनी आमचे उत्स्फूर्त स्वागत केले. आणि आम्हाला इतके खाऊ पिऊ घातले की घरी येऊन जेवण करण्याची आवश्यकता भासली नाही. विशेष म्हणजे साहेब आम्हाला त्यांच्या बंगल्याच्या फाटकापर्यंत सोडायला आले. आमचे मित्र पाहताच राहिले. एक जिल्हाधिकारी माणूस इतके आदरतिथ्य करू शकतो हे मित्राच्या दैनंदिनीत प्रथमच घडत होते. मला मात्र ते नेहमीचेच होते. सौ वहिनी साहेबांनी देखील सर्वांना आग्रह करून सर्व पदार्थ खाऊ घातले .
साहेब सोलापूरला असताना माझा मी आय ए एस अधिकारी होणारच कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमानंतर जेवण झाल्यानंतर साहेब म्हणाले तुम्ही आराम केल्यापेक्षा माझ्याबरोबर चला. तुमच्या मिसेसला पण सोबत घ्या. माझे एक आयएएस मित्र आहेत मल्लिनाथ कलशेट्टी. त्यांनी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ एक कार्यक्रम त्यांच्या गावला ठेवलेला आहे. तुम्ही आईवर प्रेम करता म्हणून तुम्ही त्या कार्यक्रमाला येणे गरजेचे आहे. मी व सौ विद्या साहेबांबरोबर त्या कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला बरेच वरिष्ठ आयएस अधिकारी आले होते त्यामध्ये माझे मित्र श्री वीरेश प्रभू या आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही निघायची घाई करू लागलो. कारण की अमरावतीला परत जायचे होते .साहेब म्हणाले तुम्ही सायंकाळचे जेवण करूनच मुक्काम करूनच उद्या सकाळी जा. रात्रीचा प्रवास करू नका. सौ. वहिनींनी आमचे मनापासून आदरतिथ्य केले व दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी प्रस्थान केले .पण सौ वहिनींनी आम्हाला अमरावती पर्यंत पुरेल एवढे खाद्यपदार्थ व फळ फळावळ आमच्या गाडीत कर्मचाऱ्याकरवी भरून दिले. आणि आम्हाला सूचना दिली की रस्त्यात काही खाऊ नका. तुम्हाला रोज भाषणे द्यावे लागतात. तुमची प्रकृती बिघडू नये म्हणून मी अमरावतीपर्यंत पुरेल एवढे खाद्यपदार्थ व फळाफळावळ तुमच्या गाडीमध्ये दिले आहेत. केवढी ही माया. अशा आपुलकीमुळेच डोंगरे परिवाराने लोकांना जिंकले आहे.
साहेब अमरावतीला महसूल विभागामध्ये अमरावती विभागाचे महसूल उपायुक्त असताना कांतानगर येथील शासकीय बंगल्यात राहत होते. दुपारी बारा एक वाजता मी त्यांच्याकडे गेलो. तर ते व त्यांचे जिवलग मित्र श्री दिलीप स्वामी हे डायनिंग टेबलवर बसले होते. सणाचा दिवस होता. मी आल्याचे कळताच कळताच त्यांनी मला सरळ डायनिंग टेबलवर बोलाविले. पुरणपोळीच्या बेत होता. आणि त्यांनी आग्रह करू करू सुग्रास भोजन दिले. वहिनी आणि साहेब स्वतः लक्ष देऊन मला आग्रह करीत होत्या. इतकी ही प्रेमळ माणसे.
आम्ही अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये एक कार्यक्रम घेतला होता . साहेब तेव्हा अमरावती महानगरपालिकेमध्ये आयुक्त होते. आमच्या कार्यक्रम चार वाजता होता. साहेब प्रमुख पाहुणे होते. माझे कार्यक्रम तंतोतंत वेळेवर सुरू होतात हे साहेबांना माहीत होते. नेमके चार वाजता साहेबांना महत्त्वाचे काम निघाले. ते स्थगित करण्यासारखे नव्हते. साहेबांनी त्यांचे जिवलग मित्र व तेव्हाचे अमरावतीचे राजपत्रित अधिकारी श्री दिलीप स्वामी यांना फोन केला. काठोळे सरांचा कार्यक्रम आहे. मला महत्त्वाचे काम निघाले आहे. तुम्ही आठवणीने बरोबर चार वाजता कार्यक्रमाला जा. आणि माझे प्रतिनिधित्व करा. किती ही आपुलकी. मला जमणार नाही असे ते सांगू शकले असते. पण आपण गेलो नाही तर काठोळे सरांची गैरसोय होईल म्हणून त्यांनी पर्यायी व्यवस्था करून दिली होती. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे व तो आजही कायम आहे.
साहेबांच्या मुलीचे लग्न ठरले. सुरुवातीला साक्षगंध. तर काही दिवसानंतर लग्न. दोन्ही वेळेस साहेबांनी प्रत्यक्ष मला फोन करून तुम्ही आलेच पाहिजे असा आग्रह धरला. एक सनदी अधिकारी माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला फोन करतो साक्षगंधाला या विवाहाला या असा आग्रह धरतो हे क्वचित घडते. पण डोंगरे साहेबांना ती किमया साधली आहे. साहेबांच्या मुलीच्या साक्षगंधाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी हे आवर्जून उपस्थित होते. साहेबांच्या मुलीच्या लग्नाला तर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे 45 मिनिट लग्न समारंभ स्थळी आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या विवाह समारंभाला 45 मिनिटे देतो यावरून साहेबांचे व त्यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे लक्षात येते. साहेबांनी अशी नाती जपली आहेत आणि म्हणूनच त्यांचे मित्र देखील त्यांना जपण्याचा प्रयत्न करतात हे वेगळे सांगणे न लगे.
साहेबांचा अमरावतीचा ऋणानुबंध प्रशासनाने देखील लक्षात घेतला आणि म्हणून ते सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्यांना अमरावती विभागाची महसूल विभागाची महत्त्वाची जागा असलेली राज्यसेवा हक्क आयोग या शासकीय यंत्रणेचे आयुक्त म्हणून नियुक्ती देऊन त्यांच्या प्रशासकीय कामाचा एक प्रकारे गौरवच केलेला आहे. आपल्या सुस्वभावामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणाऱ्या त्यांना आपलेसे करणारे हे ज्येष्ठ सनदी अधिकारी अमरावती विभागात लवकरच रुजू होत आहेत. अर्थातच अमरावती विभागामध्ये त्यांचे सर्वांकडून प्रचंड स्वागत होईल यात दुमत नाही.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
