आंबा व काजू पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात यंदा कडाक्याची थंडी आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू या प्रमुख फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.
आंबा व काजू पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे , तंत्र अधिकारी विरेश अंधारी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, पंचनामे करताना एनडीआरएफ/एसडीआरएफच्या निकषांचे काटेकोर पालन करावे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. आंबा व काजू पिकांचे पंचनामे दोन हेक्टरपर्यंत मर्यादित स्वरूपात करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
