महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास
आंबा पिक संरक्षणासाठी AI व ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर; सेवा पंधरवड्यात हजारो दाखल्यांचे वाटप
सिंधुदुर्गनगरी :
महाराष्ट्र दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंड येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडिमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले की, १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन मराठी माणसाला नवी ओळख मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनी महाराष्ट्राला प्रगतीचा मार्ग मिळाला, असे त्यांनी नमूद केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कृषी आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वितरण व खर्चामध्ये सिंधुदुर्ग राज्यात प्रथमस्थानी असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंबा व काजू पिकांना हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विमा भरपाई देण्यात आली असून भविष्यात AI आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा पिक संरक्षणासाठी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सेवा पंधरवड्याअंतर्गत हजारो विद्यार्थ्यांना वय, अधिवास व जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य, निवारा, महिला सक्षमीकरण आणि कुपोषण निर्मूलनासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुरक्षेच्या दृष्टीने ‘ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग’ अभियान, २४ तास पेट्रोलिंग तसेच सीसीटीव्ही प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कुडाळ येथील ‘चिमणी पाखरं’ समूहाने सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली.
