You are currently viewing शीर्षक: हरवलेल्या पाऊलवाटा

शीर्षक: हरवलेल्या पाऊलवाटा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. सौ. निलांबरी गानू लिखित अप्रतिम लेख*

 

*शीर्षक: हरवलेल्या पाऊलवाटा*

 

डोंगराच्या कडेने जाणारी, नदीच्या काठावर थांबणारी, दवबिंदूंनी शहारलेल्या पर्णफुलांनी बहरलेली, निसर्गाच्या कुशीत श्वास घेणारी, मनाला तृप्ततेत भिजवून काढणारी, शाळुच्या शेतातून वाट काढत जाणारी, कापसाच्या बोंडातून चैतन्य उतू जाताना पाहणारी, नवचैतन्याने बहरलेली पायवाट अजून तिथेच आहे हरवले आहोत ते आपणच.

 

आपण नको इतके आता व्यस्त झालो आहोत. पैसे मिळवण्याचे एक मशीन बनलो आहोत. एकमेकांशी असलेल्या नात्यांची कदर आता उरलेली नाही, उरले आहे फक्त रुक्ष जिणे.

 

प्रत्येकाची काही स्वप्न असतात. सुखाच्या आनंदाच्या आणि मनमोकळ्या स्वच्छंद वातावरणातील पायवाटेने फिरण्याचे. मला वाटते हे सर्वांचे स्वप्न असावे. जीवन म्हणजे जीवन आणि मृत्यू येथील प्रवास असला तरी कधी कधी या प्रवासातील दुःखाच्या वेळा विसरायला लावणाऱ्या या पायवाटा फक्त निसर्गाच्या सानिध्यातच सापडू शकतात.

 

आठवड्याभराची दगदग विसरण्यासाठी काही वेळा आपण या पायवाटेने थोड्यावेळ चाललो तर आपल्या जीवनातील आनंद पुन्हा मिळू शकतो

 

जीवनाच्या प्रवासात प्रत्येक वळणावर जरा थांबून बघितले तर निसर्गातील मुक्त अवकाश सापडते आणि पुढील वाटचालीसाठी निसर्गाच्या सानिध्यात मन पुन्हा तरुण होते. यासाठी फक्त आपण तिथे जाणं महत्त्वाचं आहे ते आपल्याला जमलं की सगळं जमलं.

 

या पायवाटेने चालताना निसर्गाच्या सानिध्यात असंख्य रूपातून भेटणारा निसर्ग हाच एकमेव शाश्वत गुरु आहे. निसर्गाला नाही आदी, नाही अंत. पक्षी, प्राणी, झाडे, दर्या, डोंगर, धबधबे, लांबच लांब पायवाटा, त्यांच्या दुतर्फाची पण हिरवीगार झुडपे, माणसे, छोटी छोटी घरे, सर्व वेगवेगळे असूनसुद्धा प्रत्येकामुळे मनाला काही शिकवण देण्याचे सामर्थ्य निसर्गात असते एवढं खरं.

 

घोंगावणाऱ्या वाऱ्याला घमासान पावसाला मग लव्हाळी सुद्धा वाहून जात नाहीत. जणू ती शिकवितात की, दुःखात किंवा आपत्ती ओढवली असता आपले अस्तित्व कसे टिकवायचे. पशु, पक्षी या आपत्तीकाळात कुठेतरी स्वतःला सुरक्षित करतात आणि सर्व शांत झाल्यावर पुन्हा झाडांवर बागडू लागतात.

 

मोराला पाऊस येणार हे आधीच समजते आणि तो पावसाचे स्वागत करण्यास पिसारा फुलवून नृत्य करू लागतो पण माणसाला मात्र निसर्गाची ही अवस्था पाहायला जाणं जमतच नाही. म्हणजेच आपण तिथे जात नाही. तेवढा आपल्याला वेळच नसतो. त्या हिरव्यागार श्रावणात आणि त्यातील ऊन पावसाच्या विहंगम दृश्याचा अनेक दुःखांवर इलाज असतो, सामर्थ्य असतं. हे आपण कधी अनुभवतच नाही.

 

त्यामुळे मला असं वाटतं की, पाऊलवाटा हरवल्या नाहीयेत, त्या आहे तिथेच आहेत. हरवलो आहे ते आपण. आपण त्यांच्याकडे पाठ फिरवली ही मोठी दुःखाची बाब आहे.

 

नुसते लिखित प्रवासवर्णन जरी आपण वाचले तरी आपल्या मनाला अनेक बाजूंनी दिलासा मिळतो. अशा या महान क्षमतेला जर जवळून पाहून त्याची भक्ती केली तर त्याची आशीर्वाद देण्याची अनोखी पद्धत पाहून मन अचंबित होईल आणि मनाला प्रत्येक सेकंदात टिकून राहण्याची, संकटात टिकून राहण्याची संधी मिळेल.

 

त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन निसर्गाकडून शिकणे, निसर्ग सखासोबती, फिलॉसॉफर, गाईड आणि कधीकधी आपल्याला आपल्याबद्दल गैरसमज करून न घेणारा असा सांगाती आहे, असे नक्की वाटेल आणि त्यासाठी ही पायवाट हा सगळ्यात मोठा आधार आहे.

 

सध्या आपण सर्वजण नको इतके बिझी झालो आहोत. आपल्याला थांबायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही, अशी प्रत्येकाची अवस्था झाली आहे. आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकत नाही. मुलांना शाळाकॉलेज, तरुणांना नोकरीव्यवसाय किंवा करिअर, आणि आजीआजोबांना नातवंडांनी सांभाळण्याच्या जबाबदाऱ्यांनी जखडून टाकले आहे. वाढणारे सततचे ताणतणाव, टेन्शन, नको इतका अधीरपणा त्यामुळे आपण स्वतः पासून दूर चाललो आहोत. अशा कठीण परिस्थितीत बाहेर पडायचे असेल, रिफ्रेश व्हायचं असेल तर या हरवलेल्या पाऊलवाटा पुन्हा शोधून आपण त्याच्यावर चालणे महत्त्वाचे आहे. तेव्हा कुठे निसर्गाशी नातं जोडलेलं राहील. प्रवासात म्हणून रिफ्रेश होईल आणि अनेक अनुभव आणि स्वभावांचे नमुने पाहायला मिळतील.

 

*निसर्गाच्या सानिध्यात रिफ्रेशमेंटचे टॉनिक नक्कीच मिळवायला या हरवलेल्या पाऊलवाटा मदत करतील हे नक्की. तेव्हा या हरवलेल्या पाऊलवाटा पुन्हा शोधून काढायला हव्यात.*

 

शुभम भवतु

 

*डॉ. सौ. निलांबरी गानू पुणे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा