सावंतवाडीत वादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देणार; पालकमंत्री नितेश राणे यांचा दिलासा
६१ ठिकाणी नुकसानाची नोंद; निकषाबाहेर जाऊनही मदत देण्याचे आश्वासन
सावंतवाडी :
तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधितांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीतील विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते.
तालुक्यात सुमारे ६१ ठिकाणी नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदारांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व प्रशासनाशी चर्चा करून नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषानुसार तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे राणे यांनी सांगितले. “आज जनतेला आधाराची गरज आहे, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, श्री पंचम खेमराज महाविद्यालय व रामेश्वर प्लाझा येथे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांना नुकसानग्रस्तांना अधिकाधिक भरपाई मिळण्यासाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व स्थानिक प्रशासन नागरिकांना मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याची कामे युद्धपातळीवर सुरू असून, त्यासाठी योग्य धोरण आखण्यात आले आहे. पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, धोकादायक झाडे हटविणे, आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करणे यांसारख्या उपाययोजनाही राबविल्या जात आहेत.
महावितरणच्या कामात सुधारणा झाल्याचे सांगताना त्यांनी भूमिगत वीज वाहिन्यांसाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत निकषांमध्ये बसवून देण्याचा प्रयत्न होईल, असे त्यांनी नमूद केले.
शक्तीपीठ महामार्गाबाबतही सकारात्मक भूमिका घेत, या मार्गाचा जिल्ह्याला लाभ होईल अशा पद्धतीने नियोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून, सावंतवाडीला एमडी फिजिशियन देण्यात आला आहे. एप्रिल ते जून दरम्यान इतरही रिक्त पदे भरण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, तसेच विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
