You are currently viewing आंबेडकर जयंतीनिमित्त घारपी शाळेत विद्यार्थ्यांनी सलग दोन तास केले अवांतर वाचन

आंबेडकर जयंतीनिमित्त घारपी शाळेत विद्यार्थ्यांनी सलग दोन तास केले अवांतर वाचन

*आंबेडकर जयंतीनिमित्त घारपी शाळेत विद्यार्थ्यांनी सलग दोन तास केले अवांतर वाचन*

*बांदा*

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३५व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. ज्ञान, समता आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सलग दोन तास अवांतर पुस्तकांचे वाचन करून एक अनोखा आदर्श घालून दिला.या दिवशी बाबाजी कविटकर या विद्यार्थ्यांने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची लक्षवेधी वेशभूषा साकारली होती.
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबाहेरील विविध कथा, कादंबऱ्या, प्रेरणादायी लेख, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राशी संबंधित साहित्य मोठ्या उत्साहाने वाचले. वाचनाच्या या शांत, पण प्रभावी वातावरणात विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत ज्ञानाची ओढ आणि मनात नव्या विचारांची कोंब फुटताना दिसत होती. प्रत्येक विद्यार्थी मनोभावे पुस्तकात रमलेला पाहून उपस्थित शिक्षकांनाही समाधानाची जाणीव झाली.
शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या अमूल्य संदेशाची आठवण करून दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
यावेळी सहकारी शिक्षक धर्मराज खंडागळे, आशिष तांदुळे व मुरलीधर उमरे यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या महान जीवनकार्याचा भावनिक आणि प्रेरणादायी उलगडा केला. त्यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची, शिक्षणासाठी केलेल्या अथक परिश्रमांची आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाची विद्यार्थ्यांना प्रभावी माहिती दिली. त्यांच्या शब्दांतून विद्यार्थ्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी आदर, प्रेरणा आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली.
संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळीच प्रेरणादायी ऊर्जा जाणवत होती. विद्यार्थ्यांनी केवळ वाचनच केले नाही, तर त्या माध्यमातून ज्ञान, विचार आणि मूल्यांचा खजिना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन भविष्यातही ते नियमित वाचन करतील, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घारपी शाळेत विद्यार्थ्यांनी सलग दोन तास केले अवांतर वाचन

प्रतिक्रिया व्यक्त करा