*साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव, र. ग. खटखटे वाचनालय शिरोडा यांचा संयुक्त उपक्रम*
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात अजरामर असलेलं नाव म्हणजे प्रख्यात लेखक, कादंबरीकार, नाटककार, स्तंभलेखक कै. जयवंत दळवी..! दळवींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गेले वर्षभर साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक साहित्यिक विनय सौदागर आणि कार्यकारिणी, र. ग. खटखटे ग्रंथालय, शिरोडा व दळवींचे पुतणे सचिन दळवी यांच्या संयुक्त विद्यमाने जयवंत दळवी यांच्या “पुस्तकांवरील चर्चा ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा सांगता सोहळा आषाढी एकादशीच्या दिवशी खुद्द दळवींच्या आरवली येथील घरी जिल्ह्यातील व गोव्यातील दळवी प्रेमी साहित्यिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी साहित्यिक सतीश पाटणकर, अध्यक्षस्थानी दळवींचे ज्येष्ठ पुतणे संदीप दळवी तर विशेष अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा कवी दीपक पटेकर, खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे, साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक साहित्यिक विनय सौदागर, सचिन दळवी, प्रा.मांद्रेकर आदी उपस्थित होते.
प्रख्यात लेखक कादंबरीकार नाटककार कै जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्याचा जागर व्हावा यासाठी दर आठवड्याला कट्ट्याच्या सदस्यांनी दळवींचे एक पुस्तक वाचून त्या पुस्तकावर सविस्तर चर्चा करावी, थोडक्यात अजरामर असलेलं दळवींचे साहित्य वाचकांपर्यंत पोचवावे या उद्देशाने विनय सौदागर, सचिन दळवी, सचिन गावडे यांनी केलेली सुरुवात दिवसेंदिवस दळवींचे साहित्य उजागर करत गेली आणि वर्षभरात दळवींच्या ७० पैकी २९ पुस्तकांचे वाचन झाले. अनेकांनी प्रत्येक बैठकीत दळवींच्या साहित्याचा चर्चात्मक आढावा घेतला. यातून दळवींचे साहित्य किती महान आहे याचा प्रत्यय आला. याच खुल्या पुस्तकावरील चर्चा सोहळ्याचा समारोप रविवार दिनांक ६ जुलै रोजी दळवींच्या घरी उत्साहात झाला. जयवंत दळवी साहित्यप्रेमीनी ही सांगता करू नये हा जागर असाच सुरू रहावा असा धरलेला आग्रह हीच या कार्यक्रमाची पोचपावती आहे.
पुस्तकावरील चर्चा समारोप निमित्त “आत्मचरित्रा ऐवजी…” या दळवींच्या आत्मकथनाचा परिचय करून देताना गोवा येथील निवृत्त प्रा.गजानन मांद्रेकर यांनी “माझे नाट्यक्षेत्रातले पडेल पदार्पण…” या दळवींच्या एका भागाचे सुरेख विश्लेषण केले. अपयशाने खचून न जाता दळवींनी यशाकडे काही झेप घेतली आणि नाटके, कादंबऱ्या मिळून जवळपास ७० पुस्तके लिहिली याचा सुंदर उवापोह केला. ज्येष्ठ वाचक सरोज रेडकर यांनी “आपुले मरण पाहिले म्या डोळा ” यावर चिंतनशील भाष्य केले तर सौ.स्नेहा नारिंगणेकर यांनी “माझ्या कुटुंबात मी…” मधून दळवींच्या आत्मपर विचारांचे, अनुभवांचे संकलन, नातीगोती यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. आत्मचरित्र कोणी खरे लिहित नाही. असे दळवी सांगायचे असे सांगून जयवंत दळवींच्या विपुल लेखनावर प्रकाश टाकला. दळवींचे पुतणे सचिन दळवी यांनी आई आणि तीन काकी…म्हणजे “त्या चौघी” यावर भावस्पर्शी विचारमंथन केले. दळवींच्या घरातील स्त्रियांच्या बंधनांवर आणि एकंदरीत त्यावेळच्या परिस्थितीवर दळवींनी केलेली सत्य वाच्यता कथन करताच वातावरण भावूक झाले..घरातील स्रियांची होणारी ससेहोलपट आणि ती अवस्था पाहून संवेदनशील लेखक जयवंत दळवी यांना होणाऱ्या मानसिक वेदना याचा काही प्रसंग सांगून केलेले कथन ह्रदयाला भिडणारे होते. जयवंत दळवी हे वेतोबा देवस्थानाचे बिनपगारी व्यवस्थापक होते एवढे ते वेतोबामय झालेले असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
अतिथी मनोगतां मध्ये विशेष अतिथी दीपक पटेकर यांनी अगदी मोजक्या शब्दात दळवींचे साहित्य सहज सोप्या शब्दात लिहिलेले असल्याने आजही मराठी मनामनात कोरलेले आहे याचा सुंदर उहापोह केला. साहित्याचा दर्जा चांगला असला की वाचक शोधावे लागत नाहीत तर साहित्य आपोआप वाचले जाते असेही ते पुढे बोलताना म्हणाले. विनय सौदागर यांनी साहित्य प्रेरणा कट्टाच्या माध्यमातून सुरू केलेल्या साहित्य सेवेचे देखील त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सतीश पाटणकर यांनी दळवींच्या सोबत ४५ वर्षांपूर्वीची आठवण सांगताना शिरोडा, माहीम मासळी मार्केट मधील घडलेले प्रसंग कथन केले. दळवी रत्नागिरी येथील एकमेव साहित्य संमेलनाला सपत्नीक उपस्थित होते याचीही त्यांनी आठवण सांगताना ज्यावेळी जयवंत दळवी निवर्तले तेव्हा स्वतः बाळासाहेब ठाकरे एक तास दळवींच्या घरी उपस्थित होते अशा आठवणी सांगून दळवींचे साहित्य आणि माणूस म्हणून दळवी कसे होते याचे अनेक दाखले त्यांनी दिले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संदीप दळवी यांनी जया काकांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी १४ ऑगस्ट या दळवींच्या जन्मदिवशी साळगावकर हॉल आरवली येथे दळवींच्या जन्मशताब्दी निमित्त भव्य कार्यक्रम आयोजित केला असून त्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. सत्यार्थ महाराष्ट्र या युट्युब चॅनेलचे प्रमुख, निवेदक प्रा. रूपेश पाटील यांनी भविष्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून दळवींच्या साहित्याचा जागर प्रभावीपणे करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. दरम्यान या कार्यक्रमात जर्नलिझमच्या परिक्षेत यश मिळवले म्हणून ॲड नकुल पार्सेकर यांचाही सन्मान करण्यात आला.
आरवली येथील दळवींच्या घरी पार पडलेल्या सांगता सोहळ्यात गोवा, कणकवली, वेंगुर्ला, तळवडे, सावंतवाडी, शिरोडा येथून बहुसंख्येने उपस्थित असलेल्या व जयवंत दळवी यांच्या साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या रसिकांनी दळवींच्या सहवासाने पावन झालेल्या साहित्य सहवास मध्ये एक मंतरलेली सांज अनुभवली. यावेळी वैभवी शिरोडकर, अनिल निखार्गे, सोमा गावडे, सौ अनिता सौदागर, मंगेश दळवी, वेद दळवी, दिलीप पांढरे, एकनाथ शेटकर, संतोष आरोलकर, संजय पै, दिलीप मालवणकर, विलास नाईक, सौ प्रगती परब, सुभाष शेटगावकर, महेंद्र परब, दिलीप मेथर, गिरीधर राज्याध्यक्ष, नीलिमा राजाध्यक्ष, प्रसाद प्रभू वालावलकर, ऋचा दळवी, गौरी दळवी, पुरुषोत्तम दळवी, अनिशा रगजी, प्राची पालयेकर, दयानंद नाईक, भालचंद्र दीक्षित, जयदीप देशपांडे, शेखर पणशीकर आदी दळवी प्रेमी, वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय सौदागर यांनी केले तर आभार र. ग. खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी मानले.