झाडांची मुळं मातीत खोलवर घट्ट रुजलेली असतील तर ते ऊन, वारा, पाऊस आणि वादळातही जराही उन्मळून न पडता मोठ्या डौलाने खंबीरपणे उभे राहून जगण्याची खरीखुरी मजा लुटत राहतात.हे जसे निसर्गाला लागू पडते अगदी तसेच प्रत्येक माणसालाही लागू पडते. त्यासाठीच अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या संपूर्ण आयुष्यभराच्या प्रवासात आपल्या सभोवतालची परिस्थिती आणि त्यातून नकळतपणे मनावर होणारे संस्कार हे खूप मोठी क्रमविकासाची भूमिका पार पाडत असतात.
यामध्ये काही माणसं ही आपल्या वाट्याला आलेल्या कामातून समाजाशी असलेली ऋणानुबंधाची नाळ ही अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने अगदी निरपेक्ष, प्रामाणिकपणे धडपड करीत असतात. त्यांचे ते धडपडणे आणि त्यातून समाजहिताचं काही शाश्वत विधायक काम उभं राहणं, ही परिवर्तनाची खूप मोठी आश्वासक बाब असते. ज्यातून समाजात अजूनही चांगुलपणा, नित्तिमत्ता, सामाजिक भान याची जाणीव टिकून आहे नव्हेतर ती समाजमनात सुसंस्काराचे बीज पेरत निकोप समाज निर्मितीचे स्वप्न काळजात घेऊन दु:ख, दारिद्र्य आणि नैराश्याने अंधारल्या दिशांना उजळत ठेवण्याची ज्ञानसाधना अगदी व्रतस्थपणे व अखंडपणे सुरु असल्याची साक्ष देत राहते.
ही सारी जाणीव आणि प्रत्यक्ष कार्य ज्यांच्या ठायी ठासून भरलेलं आहे, असे प्रसिद्ध व्याख्याते आमचे आदरणीय गुरुवर्य अभय भंडारी यांचे अभ्यासपूर्ण, वैचारिक बैठकीतून आलेल्या मौलिक विचारातून प्रबोधनाचे कार्य हे निश्चितच समाज विकासात, परिवर्तनाच्या कार्यात मोठे योगदान ठरले आहे आणि यापुढेही ते ठरत राहिल, हे निसंदेह आहे. बांधकाम क्षेत्रात एक यशस्वी अभियंता म्हणून काम करताना त्यांनी आजच्या काळात आत्मकेंद्रित वृत्ती, संस्काराचा अभाव, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण अशा कारणांनी समाजाचे अधःपतन होत असताना ते वेळीच रोखण्याची गरज ओळखून आपल्याकडच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करत व्याख्यान, लेखन कार्यातून सामाजिक प्रबोधनाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याची धडपड सुरु ठेवली आहे.
एवढ्यावरच समाधान न मानतात्यांनी विट्याजवळ भिर्डी गावच्या हद्दीत उजाड माळरानावर अविरत कष्टाने विविध देशी वृक्षांची लागवड करुन त्याचे चांगले संवर्धन केले आहे. यातून त्यांनी कृषी संस्कृतीचा वारसा जपताना आजच्या नव्या पिढीला या मातीशी असलेली नाळ कशी टिकवून ठेवता येईल, निसर्गाविषयी असलेली कृतज्ञतेची जाणीव कायम रहावी, यासाठीची त्यांची प्रामाणिक धडपड दिसून येते. म्हणूनच त्यांचे कृषी, शिक्षण, अध्यात्म, भारतीय संस्कृती, महापुरुष अशा विविध विषयांवरील व्याख्यान, लेखन हे समाजाला चांगली दिशा देणारे ठरले आहे.
विशेष म्हणजे केवळ भौतिक सुख साधनांनी श्रीमंत होण्यापेक्षा चांगल्या विचारांनी सुसंस्कारित होणं आणि आपल्या परिने विविध माध्यमातून समाज विकासात योगदान देऊन समाजाची ,देशाची सेवा करुन ख-या अर्थाने आयुष्य समृद्ध करणं किती गरजेचं आहे, याचे महत्त्व ते आपल्या कृतीशील आचार, विचारातून दाखवून देतात. म्हणूनच अखंड ज्ञानसाधना करणारा हा व्रतस्थ साधक नित्तिमत्ता, धर्म शिकवणुकीचे आचरण, चांगुलपणा अशा संस्कारांचे बीज मना -मनात पेरताना समाजाची इमारत भक्कम करत त्यात सर्व जातीधर्माची माणसं अगदी पूर्वीसारखीच गुण्यागोविंदाने रहावीत आणि पुन्हा एकदा मानवतेच्या धर्मावरील विश्वास, श्रध्दा वृद्धिंगत होत रहावी आणि भारतीय संस्कृतीचे महत्व नव्यानं जगाच्या पटलावर अधोरेखित होत रहावं, यासाठी करत असलेल्या कार्यातून वंदनीय ठरतो.
आदरणीय गुरुवर्य अभय भंडारी यांची अनेक विषयांवरील व्याख्याने यु – ट्यूबवर ऐकताना त्यांनी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, छत्रपती शिवाजी महाराज, विनायक दामोदर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, जे.कृष्णमूर्ती अशा अनेक थोर पुरुषांचे कार्य, विचार आणि त्याची आजच्या काळात असलेली गरज अगदी विविध उदाहरणांव्दारे स्पष्ट केली आहेत. यातून त्यांच्या सखोल अभ्यासाची, प्रवाही वक्तृत्व व मुद्देसूद मांडणीच्या कौशल्याची प्रचिती आल्याखेरीज रहात नाही.हे सारं अनुभवताना त्यांच्यातली देशभक्ती, सच्चेपण, समाजाच्या विकासासाठी असलेली पोटतिडक देखील प्रकर्षाने जाणवत राहून त्यांच्याबद्दलचा मनातला आदर आणखीनच वाढत राहतो.आणि म्हणूनच त्यांच्या कार्याविषयी,
ज्ञानियाच्या पालखीचे सारे आम्ही खांदेकरी
उधळू फुले प्रकाशाची अंधाराच्या वाटेवरी !
अशीच आदराची भावना ही मनाला अपार सुख, समाधान देतानाच ख-याखु-या समृद्ध जगण्याची शिकवण देत राहते.
जे का रंजलेगांजले, त्यासि म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा !
याची प्रचिती त्यांच्या मानवसेवेतून येते. म्हणूनच आदरणीय गुरुवर्य तुमच्या कार्याच्या रुपाने आम्ही चालते – बोलते संत अनुभवतोय. गुरुवर्य आज तुमचा जन्मदिवस. तुमच्या हातून असेच सत्कार्य घडून ते अनेकांना प्रेरणादायी व अनुकरणीय ठरतो ,याच तुम्हाला जन्मदिनाच्या उदंड व मनस्वी शुभेच्छा !
– सागर बाणदार
– इचलकरंजी
– मो.८८५५९१५४४०