You are currently viewing चहा

चहा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*चहा*

 

ज्या कोणी *चहा* नावाचं हे उत्कट पेय शोधून काढलं त्यांचे मी प्रथम मनापासून आभार मानते.तसा चहाचा इतिहास काहीही असूदेत. चहाचं पहिलं रोप चीनमधून आलं आणि भारतात त्याचे मळे फुलले वगेरे वगैरे..पण त्या चहा निर्मात्याला माझा सादर प्रणाम!

 

तसा चहा माझ्या आयुष्यात थोडा उशिराच आला. “लहानपणी मुलांनी चहा प्यायचा नाही” हा एक नियम पालकांनी घालून दिला होता. सकाळी खात्रीशीर गवळ्याने आणलेलं दूध उकळवून,त्या गरम दूधाचा ग्लास निरोगी रहाण्यासाठी पिण्यातच बालपण गेलं. मेंदू ,हृदय, स्मरणशक्तीला मारक ठरणारा हा चहा तारक होऊन एक दिवस आयुष्यात आला मात्र. तो दिवस मी मनातल्या मनातच साजरा केला. कधी सायनस, कधी पचनसंस्थेचा असहकार, कधी ताण, सुस्ती या सर्वांसाठी हा गरमागरम वाफाळलेला सोनेरी रंगाचा सुगंधी चहा अतिशय उपयुक्त ठरत गेला आणि काळाबरोबर नंतर तो एक महत्त्वाचा साथी, सखा, मित्र सगळं काही बनून आयुष्यात व्यापून राहिला.

 

“पिया बिना” या शब्दा ऐवजी “चहाबिना” बाजेना बाजेना अशीच स्थिती झाली आणि अजूनही ती आहे.

 

मंगलमय प्रभात, वर्तमानपत्र, पाऊस आणि चहा यांचं एक घट्ट नातं आहे. सकाळी उठल्यावर मला प्रथम चहा लागतोच. त्यातूनही तो कुणी बनवला असेल(खास माझ्यासाठी) आणि असा गरमागरम चहा सुंदर, स्वच्छ कपबशीतून हातात आणून दिला तर ती सकाळ अवर्णनीय असते. अशा सकाळी त्यामानाने टक्केवारीत कमीच पण प्रभाते करदर्शनम् “पेक्षा “प्रभाते चहापेयम”ने जो दिवस सुरू होतो त्या सुखाचा आनंद काय वर्णावा! अशा अनेक सकाळी माझ्या आठवणीत आहेत.

 

चहाचा सुद्धा एक आकर्षक साज असतो बरं का? सुरेख तबकांत चिनी मातीचा रुंद गोलाकार, प्रसन्न नाजूक डिझाईन आणि हलकीशी सोनेरी कड असलेला कप आणि तशीच बशी आणि सोबत छान कमनीय किटली सुद्धा लागते बरं का मला!कपात डळमळत आणलेला चहा पिताना मी नाराज असते. दंवाने ओथंबलेल्या झाडांसोबत मोकळ्या आभाळाखालच्या मॉर्निंग शेडमध्ये झोपाळ्यावर बसून अशा गरमागरम चहाचे घुटके घेण्यातला आनंद काय वर्णावा! शिवाय चहा कधीच पिऊन टाकायचा नसतो. तो कसा हळूहळू घुटके घेत शरीरांतर्गत रिझवत रिचवायचा असतो यालाच मी म्हणते खऱ्या रसिकतेने चहा पिणे. आपल्या सोबत चहा पिणारा अथवा पिणारी जर याच पठडीतली असेल तर मग अशा कंपनीतल्या या चहापानाचा आनंद वेगळाच!

 

चहाचे निरनिराळे प्रहर असतात. त्यातले महत्त्वाचे प्रहर म्हणजे सकाळ आणि संध्याकाळकडे सरकत जाणारी दुपार. हा जो दुसऱ्या प्रहरचा चहा असतो ना त्याची मजा औरच आणि तो थोडा अधिक नटवलेला असतो. बाहेर धुंद पाऊस पडत असेल तर चहा सोबत गरमागरम कांदा भजी हवीतच. इतर वेळेला मग गरम कांदे पोहे, मक्याची उसळ किंवा बिस्किट्स, चविष्ट आणि अत्यंत नरम अशी सँडविचेस तरी हवीतच.

 

चहा पितानाचे माझे काही “नॉर्म्स”(नखरे म्हणूयात) आहेत म्हणजे चुकून जरी मला कुणी फुटक्या कपात चहा दिला तर आवडत नाही. बशीत सांडलेला चहा मला अजिबात चालत नाही किंवा एका कपातून जास्त झाला म्हणून दुसऱ्या कपात ओतलेला चहा मला आवडत नाही. कारण कपाच्या आजूबाजूला चहा ओघळतोच आणि असा ओंगळपणा मला चहा पिण्याचा आनंद देतच नाही पण तरीही अशी मी पुण्यात आल्यापासून मात्र जागोजाग दिसणाऱ्या *अमृततुल्य* चहाच्या टपरीवर अगदी आनंदाने चहा पिते. या टपरीतल्या छोट्या कपातला वेलदोडे, आलं, मसाला घातलेल्या चहाची गोडी काय सांगू? इथे गोडी दोन अर्थाने आहे. चहा पिण्यातली गोडी आणि दुसरी म्हणजे अक्षरशः साखरेची अतीव गोडी. खरं म्हणजे गोड चहा मला नाही आवडत पण “अमृततुल्य” चहाचा हा अनुभव घ्यायला मला फार आवडतं. त्याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे वेळ आणि खरेदी किंवा इतर जरुरीच्या कामामुळे आलेला थकवा आणि मिळालेला असा विकतचा आयता चहा हे असेल. आणि असेही आनंदाचे क्षण वेचावेत की..जीवन कसं चौफेर जगावं..

 

तर मंडळी आता इथेच थांबते कारण बाहेर बेभान पाऊस कोसळतोय. सैंयाभी घरमे है. तेव्हा अशा या धुंद पावसाळी संध्याकाळी एक चाय तो बनता है ना?

 

काय म्हणालात?आम्हीपण येतो.

“या ना” एक दिवस तुम्हीपण याच माझ्याकडे चहा प्यायला. मस्त आलं गवतीचहा, तुळस घालून केलेला माझ्याहातचा लज्जतदार चहा पिऊन तर बघा! तुम्हारे होश उड जायेंगे …

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा