You are currently viewing शब्दांचे धनी

शब्दांचे धनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दांचे धनी*

 

शब्दफुलांच्या माळा गुंफुनी

जे चित्र दाविती जनी

रसिकहो ते शब्दांचे धनी॥ध्रु॥

 

शब्दातुनी झिरपतो तयांच्या मायेचा ओलावा

वात्सल्याच्या पदराखाली मिळे वत्सास विसावा

भाव उमटती ममतेचे असेच त्यांच्या मनी

रसिकहो ते शब्दांचे धनी॥१॥

 

मिळे अनुभुती शब्दप्रभुंच्या प्रेमाविष्कारात

गुंग दंग मन होउनी जाते पुनःप्रत्ययात

नभांगणीचे रंग खुलती जणु त्यांच्या या मनी

रसिकहो ते शब्दांचे धनी॥२॥

 

शब्द दुधारी तलवारीपरि लेखणीचे वार

प्रबोधनास्तव समाजाच्या करिती प्रहार

सम्राट भासती सारस्वत ते साहित्याच्या वनी

रसिकहो ते शब्दांचे धनी॥३॥

 

रूपक उपमा उत्प्रेक्षा सजविती भूषणांनी

श्रृंगार वीर करुणा भिजविती नवरसांनी

सरस्वतीचे सच्चे उपासक भेटती वर्णनी

रसिकहो ते शब्दांचे धनी॥४॥

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

प्रतिक्रिया व्यक्त करा