You are currently viewing रवी जाधवांचा स्टॉल जैसे थे….

रवी जाधवांचा स्टॉल जैसे थे….

खऱ्या अर्थाने शहरवासीयांना न्याय मिळाला

संपादकीय……
सावंतवाडीत आजपर्यंत कधीही कुणावर अन्याय झाला नव्हता, किंवा कधी कोणा बदल्याच्या भावनेने कोणावरही सूड उगवला नव्हता, परंतु गेल्या वर्षभरात सावंतवाडी नगरपालिकेत जसा काय पोरखेळ सुरू झाला आहे. जेष्ठ असो वा कोणी अधिकारी, लोकप्रतिनिधी असो वा मंत्री नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून प्रत्येकाच्या पदाचा, मानाचा अपमान केला जात आहे. लहान मोठे असा कुठलाही भेदभाव राहिलेला नाही. आमची सत्ता आहे, आम्ही करू तेच योग्य, तुमची सत्ता असताना तुम्ही हेच केलेलात. हीच बदल्याची भावना आज सावंतवाडीत पूर्वीची सत्ता आणि आत्ताची सत्ता यातला फरक दाखवत आहे. एकाने पोटावर मारलं म्हणून आपण पाठीवर मारलंच पाहिजे असा नियम नसून आपण दुसऱ्यास आधार दिल्यास आपल्यातील चांगुलपणा दिसून येतो. परंतु तो त्याचा समर्थक, हा आपला अशी स्थिती झाल्यामुळेच समजूतदारपणा, राजकीय परिपक्वता, सामाजिक परिस्थितीचे भान सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये दिसूनच येत नाही. त्यामुळेच सावंतवाडी नगरपालिकेत केवळ बालिशपणा आणि पोरखेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
रवी जाधव या उच्चशिक्षित दलित तरुणाने तात्पुरत्या स्वरूपाच्या स्टॉल उभारणीसाठी नगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊन स्टॉल उभारला होता, सदरचा स्टॉल नगरपालिका प्रशासनाने काढून टाकून, त्यातील सामान जप्त केले होते, त्यामुळे रवी जाधव आणि त्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, बेरोजगारी आली, त्यामुळे प्रशासनाने सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून रवी जाधव सारख्या तरुणांना सहकार्य करणे आवश्यक होते, परंतु सत्तेतील राजाची मग्रुरी, दुसऱ्याला आपल्यासमोर झुकविण्याची खुमखुमी आणि अभिमान सत्कार्य करण्यापासून रोखायला लागलं. सत्ता आज आहे उद्या नाही, परंतु आपल्या कर्मानी माणसांची आठवण जनमानसांत उरते. याचे भान देखील सत्ताधाऱ्यांना राहिलेले नाही. त्यामुळेच एक दलित उपोषण करत असताना त्याच्याकडे पाहून कुत्सितपणे हसणे, ७ दिवस उपोषण करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, सावंतवाडीतील मोठमोठे लोक, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी, नेते आदींनी भेटी देत उपोषणाला पाठिंबा दिला होता परंतु सावंतवाडी नगराध्यक्षांना मात्र त्या उपोषणकर्त्याशी बोलणे उचित वाटले नाही. उपोषण कर्त्यांची मागणी कदाचित उचित नसेलही, परंतु जन्मापासून सावंतवाडी कर्मभूमी असलेल्या सुंदरवाडीच्या लेकरांपेक्षा नगराध्यक्षांना स्थलांतर करून येणाऱ्या पक्षांच्या थव्याप्रमाणे आलेले परप्रांतीय व्यावसायिक सावंतवाडीचे नागरिक असल्याचा साक्षात्कार झाला यातच त्यांची वृत्ती दिसून आली. आणि सावंतवाडीच्या लोकांनी निवडून देऊनही सावंतवाडीवासीयांविरुद्ध कदाचित सावंतवाडी रेल्वे टर्मिनल मडूरा येथे करण्यास विरोध दर्शविल्याचा रोष असल्याने प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळेच मूळ सावंतवाडी वासीयांवर अन्याय होत असताना मालानी वगैरे सारख्या परप्रांतीयांना मात्र व्यवसायासाठी बाजारपेठेत जागा देत, हिम्मत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून ठराव रद्द करून आणा अशाप्रकारची दादागिरीची भाषा त्यांच्या तोंडातून बाहेर येते. त्यामुळेच सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीचा मान मात्र राहत नाही.
सावंतवाडीत उभ्या राहिलेल्या मटक्याच्या टपऱ्या, रस्तोरस्ती पडलेला गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा खच हे पाहता सावंतवाडीचा विकास म्हणजे मटका दारुवाल्यांचा विकास अशीच संकल्पना तर सत्ताधाऱ्यांची नव्हती ना? असा संशय आज सावंतवाडी वासीयांना येत असून काही गृहसंकुलांनी आपण केलेल्या मतदानाच्या चुकीची दुरुस्ती म्हणून माजी नगराध्यक्षांना सन्मानाने आपल्या संकुलातील कार्यक्रमांमध्ये उद्घाटनासाठी बोलावण्यास सुरुवात करत भविष्यातील बदलाचे संकेत दिले आहेत.
रवी जाधव या दलित तरुणाच्या उपोषणास सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्षित केल्यानंतर लोकांचा वाढता पाठिंबा आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उपस्थितीचे भान राखून सावंतवाडी शहराचे भाग्यविधाते, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी उपोषणस्थळी भेट देत जाधव यांच्या उपोषणाची दखल घेत त्यांना महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देत, त्यांच्यावर झालेला अन्याय दूर केला. पूर्ववत स्टॉल उभारून देण्याचे आश्वासन देत उपोषण सोडविले होते. आपल्या वचनास जागत दीपक केसरकर यांनी रवी जाधव यांची मुंबईत नगरविकास मंत्र्यांशी भेट घालून देत, सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांना, रवी जाधव यांचा स्टॉल ज्या जागी होता तिथेच पूर्ववत “जैसे थे” लावण्याचे लेखी आदेश दिलेत. दीपक केसरकर यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले आणि एका दलित तरुणाला न्याय मिळाला त्यामुळे दीपक केसरकर यांचे सावंतवाडीतील जनतेवर असलेलं प्रेम प्रकर्षाने दिसून येत आहे.
नगरविकास मंत्र्यांच्या आदेशामुळे रवी जाधव यांना नक्कीच समाधान मिळाले परंतु सत्तेच्या मग्रूरीमध्ये सावंतवाडीवासीयांवर झालेल्या अन्यायामुळे आणि परप्रांतीयांचे लाड यामुळे सावंतवाडी नगराध्यक्ष मात्र शहरवासियांच्या कायम स्मरणात राहतील. संवाद मीडियाने रवी जाधव यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशीच “राजकीय बळी तर ठरणार नाही ना? बेजबाबदार सत्ताधारी आणि माणुसकी हरवलेले सावंतवाडीकर” या सदराखाली होत असलेल्या अन्यायाचा संपादकीय मधून लेखाजोखा मांडलेला होता. आज अन्याय दूर झाल्याने खऱ्या अर्थाने शहरवासीयांना न्याय मिळाल्याची भावना सावंतवाडीकरांमध्ये दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + eighteen =