You are currently viewing गरीबांनो सावधान…. अन्यथा परिस्थिती बिकट..

गरीबांनो सावधान…. अन्यथा परिस्थिती बिकट..

संपादकीय……

देशात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. गरीब असो वा श्रीमंत कोरोना कोणालाही ओळखत नाही. जो कोणी मस्ती करतो त्याला कोरोना खेळवतोच. त्यामुळे परिस्थितीसोबत मस्ती करण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जात कोरोनाशी लढण्याची ताकद निर्माण करा. पहिल्या दिवसापासून सावध रहाल तर स्वतःलाही वाचवाल आणि आपल्या प्रियजनांनाही सुखरूप ठेवाल.
कोरोनाच्या महामारीत दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या विळख्यातून गरीब श्रीमंत कोणीही सुटलेले नाहीत. फरक कोरोनामध्ये नाही परंतु फरक आहे तो गरीब आणि श्रीमंतांच्या उपचारामध्ये. गरीब माणसांना चाचणीनंतर सरकारी रुग्णालयात जाण्यावाचून पर्याय नसतो. परंतु श्रीमंत लोक मात्र आपल्या शहरात नाही तर मोठ्या शहरात जाऊन पैशांच्या जोरावर बेड उपलब्ध करून उपचार घेऊ शकतात, आपल्या स्वतःच्या जिवासाठी लाखो रुपये खर्च करू शकतात, त्यामुळे उपचाराअंती पैसे गेले तरी जीव वाचवू शकतात.
गरिबांना मात्र आपल्या जिवाच्या रक्षणाकरिता सरकारी उपचारांशीवाय पर्याय नसतो. वाढत असलेली रुग्णसंख्या, घरीच राहून फुकट घालवलेला मौल्यवान वेळ, सरकारी रुग्णालयात अनुपलब्ध असलेले बेड, कमतरता असलेली रेमडेसीविर सारखी इंजेक्शन, ऑक्सिजन आणि मुख्य म्हणजे योग्य उपचार यामुळे गोरगरिबांना मात्र आपला जीव गमवावा लागत आहे. सरकारी दवाखान्यात, रुग्णालयात अनेक डॉक्टर, इतर कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन चांगले उपचार देत आहेत, परंतु गोरगरीब रुग्ण सरकारी रुग्णालयातील उपचार आणि सरकारी रुग्णालयात आपल्याला कुठेही फेकतील, कोणी दखल घेणार नाही या भीतीपोटी कोविड टेस्ट करत नाहीत, घरातच राहून तापासाठी गोळ्या, काढा पीत राहतात आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा टेस्ट करतात, टेस्ट चा रिपोर्ट येइपर्यंत वेळ निघून जाते आणि गोरगरीब रुग्णाची ऑक्सिजन पातळी घटल्यावर त्याला सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो.
उपचार करण्यासाठी वेळ घालविल्याने गोरगरीब रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल तर होतात परंतु सरकारी रुग्णालयात असणारी ऑक्सिजन बेडची कमी, रुग्णाची ऑक्सिजन पातळी, फुफ्फुसाला झालेलं इन्फेक्शन, सीआरपी स्कोर, डी-डायमर टेस्टचा स्कोर इत्यादी वाढल्याने रुग्ण उपचारासाठी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्ण दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. गोरगरिबांनी घरातच राहून ताप सर्दी कफ बरा होईल अशी आशा बाळगून उपचार करण्यास घाबरण्यापेक्षा तात्काळ टेस्ट करून सरकारी रुग्णालयात प्राथमिक अवस्था असतानाच उपचार सुरू केले तर केवळ अँटीबीओटीक गोळ्यांनीच रुग्ण बरे होतात, आणि जीविताचा धोका टळतो. कोरोनाला हरवायचे असेल आणि मरणाला दूर ठेवायचे असेल तर गोरगरीब रुग्णानी वेळेतच उपचार सुरू करावेत……अन्यथा मरणाला कोणीही थांबवू शकणार नाही…

प्रतिक्रिया व्यक्त करा