You are currently viewing महत्त्व अभ्यासाचे

महत्त्व अभ्यासाचे

*के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे प्रा प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

 

*महत्त्व अभ्यासाचे*

 

“असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे”

अशक्यप्राय गोष्टी सुद्धा अभ्यासाने सहज साध्य होतात, हेच संत तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितले. आपल्याला आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सतत अभ्यासाची गरज असते. कारण जग फार वेगात बदलत आहे. बदलत्या जगा नुसार आपण बदल नाही स्वीकारला तर निश्चितच आपण मागे राहू.

विद्यार्थी दशेत असताना विविध पद्धतीने अभ्यास केला तर तो मनोरंजनात्मक व आनंददायी होतो. नुसता होमवर्क, पाठांतर, वाचन नकोच. त्याऐवजी स्वतः प्रश्न तयार करणे, नोट्स काढणे, पीपीटी बनविणे, वादविवाद, प्रश्नमंजुषा, चर्चासत्र, गप्पाष्टक, संभाषण, मुलाखत, प्रत्यक्ष कृती करून, खेळ, प्रकल्प बनविणे, उजळणी यामुळे अधिक सखोल अभ्यास होतो.

खरं तर विद्यार्थ्यांसमोर अभ्यास कसा करावा हा खूप मोठा प्रश्न असतो. अभ्यास करण्यामध्ये आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपला मेंदू. अभ्यास चांगला होण्यासाठी व लक्षात राहण्यासाठी अभ्यास केल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळणे आवश्यक असते. त्यामुळे शक्यतो वैयक्तिक अभ्यास करताना रात्री झोपण्यापूर्वी अभ्यास करावा म्हणजेच रात्री झोपताना मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यासारख्या तत्सम वस्तूंपासून लांब राहावे. अभ्यास केल्यानंतर आपण झोपतो म्हणजे आपल्या मेंदूला विश्रांती देतो. त्यामुळे जो काही अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहतो. सकाळी उठल्यावर आपण रात्री काय अभ्यास केला ते आठवून लिहून बघितलं तर नक्कीच लक्षात येतं की आपल्याला चांगल्यापैकी लक्षात राहत आहे.

याशिवाय दिवसभरात ज्यावेळी माणसाचे मन फ्रेश असते आनंदी असते अशा वेळेस अवघड किंवा कठीण विषयांचा अभ्यास करावा आणि जेव्हा कंटाळा किंवा बदल हवा असतो तेव्हा आपल्या आवडत्या किंवा सोप्या विषयांचा अभ्यास करावा.

अभ्यास लक्षात राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स, फंडे वापरू शकतो. म्हणजे अनेक मुद्दे एका शब्दात गुंफता येऊ शकतात. उदाहरणार्थ ‘तानापिहिनिपाजा’ या एका शब्दात इंद्रधनुष्याचे सात रंग दिसतात तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. पूर्वीपासून आपल्याकडे उद्या जो भाग शिकवणार आहेत त्याचे आधी वाचन करणे अपेक्षित होते. त्यामुळे अध्ययन करतानाच लक्षात राहणे सुलभ आणि सोपे होऊन जाते

एकाच वेळी सर्व अभ्यास न करता रोज थोडा थोडा अभ्यास करत राहणे, केलेल्या अभ्यासाची उजळणी करणे, सुट्टीच्या दिवशी झालेल्या घटकांची उजळणी करणे यामुळे सुद्धा चांगला अभ्यास होतो.

बऱ्याच वेळेला अशी एखादी गोष्ट आपल्याला करावी लागते की जी आपल्याला जमत नसते किंवा आपल्याला करायला आवडत नसते. अशावेळी ती गोष्ट किमान गरजेपुरती किंवा आपलं नुकसान होणार नाही इतपत शिकून घ्यावी.

अभ्यास करताना इतरांकडे असलेल्या ज्ञानाचा, कौशल्यांचा उपयोग समजून घेणे हे फार महत्त्वाचे असते. म्हणजेच जगात सध्या काय चालू आहे याची सखोल माहिती घेणे नाहीतर मग आपण आपल्याच विश्वात रममाण राहतो. इतिहासात भारतावर आक्रमण करणारे आक्रमक हे आपल्यापेक्षा अधिक प्रगत असल्याचे आपल्याला दिसून येते. आपण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा वेगळं काय आहे व त्यावर कशी मात करता येईल याचा विचार फारसा केलेला दिसून येत नाही. परिणामी अनेक युद्धांमध्ये परकीय आक्रमकां समोर आपला पराभव झालेला दिसून येतो. त्यामुळेच आपल्याला शेकडो वर्षापासून ची गुलामी स्वीकारावी लागली. हे कदापि विसरता कामा नये.

धन्यवाद.

 

लेखक

प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे

के.रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली.

prashantshirude1674@gmail.com

9967817876

प्रतिक्रिया व्यक्त करा