भारताने बनवलेले तेजस विमान खरेदी करण्यास अनेक देश उत्सुक

भारताने बनवलेले तेजस विमान खरेदी करण्यास अनेक देश उत्सुक

नवी दिल्ली – हिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स लि कंपनीने स्वदेशी तंत्राने तेजस ही हलकी लढाऊ विमाने तयार केली असून ही विमाने विकत घेण्याची तयारी अनेक देशांनी दर्शवली आहे अशी माहिती या कंपनीचे प्रमुख आर माधवन यांनी दिली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की भारतीय हवाईदलासाठी आम्ही तेजस विमाने पुरवण्याचा 48 हजार कोटी रूपयांचा करार केला आहे. त्यानुसार हवाईदलाला विमाने पुरवण्याची प्रक्रिया मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. दर वर्षी 16 विमाने हवाईदलाला सुपुर्त केली जातील असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की अनेक देशांनी या विमानात स्वारस्य दाखवले असून त्या देशांशी संपर्क साधला जात आहे.

येत्या दोन वर्षात आम्हाला तेजसच्या निर्यातीची ऑर्डर मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की तेजस मार्क 1 ए बनावटीचे भारताने तयार केलेले लढाऊ विमान हे चीनच्या जेएफ 17 विमानापेक्षा अधिक आधुनिक आणि कार्यक्षम आहे.

यात अधिक चांगले इंजिन, रडार सिस्टीम, आणि इलेक्‍ट्रॉनिक लढाऊ यंत्रणा कार्यरत आहे. अन्य तंत्रज्ञानाच्या बाबतीतही भारताचे हे विमान चीनच्या विमाना पेक्षा अधिक कार्यक्षम आहे. या विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्याची सोय आहे.

ती चीनच्या याच स्वरूपाच्या विमानात नाही. भारतीय हवाईदलाला या कंपनीकडून एकूण 83 विमाने पुरवली जाणार आहेत अशी माहितीही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. या विमानाची बेसिक किंमत 309 कोटी रूपयांची आहे. प्रशिणार्थी विमानाची किंमत 280 कोटी रूपये इतकी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा