You are currently viewing महावितरणने जबरदस्तीची वीजबिल वसुली थांबवावी. आम्ही जशास तसे उत्तर दिले तर महागात पडेल!

महावितरणने जबरदस्तीची वीजबिल वसुली थांबवावी. आम्ही जशास तसे उत्तर दिले तर महागात पडेल!

भाजपा कुडाळ चिटणीस राजेश पडते यांचा थेट इशारा

कोरोना लॉकडाऊन काळात व्यापारी आणि सर्वसामान्य लोक घरात बसले ती आवडीने नव्हे, तर राज्य आणि केंद्रशासनाने प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या वापरून त्यासाठी भाग पाडले. कोरोनाला आळा घालण्यासाठी ते आवश्यक होते, तसेच आताही छोटे मोठे उद्योजक, व्यापारी आणि जनता जगायची असेल तर वीजबिलांचा वेगळा विचार करावाच लागेल. कोरोना लॉकडाऊन काळापासून रिडींग घेत जी अवाच्या सवा बिले आली आहेत, त्याला ही जनता जबाबदार नाही. सत्तेवर येईपर्यंत वीजबिल माफ आणि सात बारा कोरा करणारे शिवसेनेचे सरकार आता कुठल्या बिळात लपले आहे हा प्रश्न जनता विचारत आहे. सत्ताधाऱ्यांनी आर्थिक अडचणीत आलेल्या कोकणला आणि कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडले, तरी भाजपा सोडणार नाही. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या पाठीशी राहील.

लॉकडाऊनच्या काळात मोडलेले आर्थिक कंबरडे गृहीत धरता त्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे होते, पण वारंवार लोकशाही मार्गाने मोर्चे काढून, निवेदन देऊन महावितरणच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल, तर त्यासाठी समजेल अशा पद्धतीने उत्तर दिले जाईल. जनतेसाठी महावितरण समजावण्याची योग्य पद्धत नक्की वापरली जाईल, असा गर्भित इशारा भाजपा कुडाळ चिटणीस श्री राजेश पडते यांनी दिला आहे.

महावितरणचे अधिकारी व कर्मचारी चुकीच्या पद्धतीने दमदाटी करुन, विज कनेक्शन कट करून जबदस्तीने वीजबिल वसूल करण्याचे मार्ग अवलंबत असल्याच्या तक्रारी जनतेतून येत आहेत. या प्रकाराने जनता त्रस्त व भयभीत झाली आहे. हजारो रुपये वीजबिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न आहे. आधीच जगण्याला वैतागलेल्या लोकांच्या बाबतीत हे प्रकार चालवल्याने काही गंभीर प्रसंग निर्माण होऊ शकतात. या आपत्तीच्या वेळी मोगलाई अवतरल्याप्रमाणे जर जबरदस्तीच्या मार्गाने विजबिल वसूल करण्याचे धोरण महावितरणने चालवले, तर याद राखा. यापुढे वीजबिल भरण्यासाठी एकजरी लाईट कनेक्शन कापल्याची तक्रार आली तर गाठ भाजपाशी आहे हे ध्यानात ठेवावे. भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे आणि जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. पण सरळ सांगूनही समजत नसेल, तर नक्कीच जशास तसे उत्तर देत समजावले जाईल, असा थेट इशारा राजेश पडते यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =