११ महिन्यांचा पगार नसल्याने फोंडाघाट मधील चिराग माईन्सच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन…

११ महिन्यांचा पगार नसल्याने फोंडाघाट मधील चिराग माईन्सच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन…

कणकवली :

११ महिन्याचा पगार नसल्याने फोंडाघाट येथील चिराग माईन्स च्या कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

कणकवली तालुक्यातील फोंडा घाट येथील चिराग माईन्स च्या कामगारांना लॉकडाउन पासून आज मितीपर्यंत गेली ११ महिने पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी तात्काळ पगार मिळावा. या मागणी साठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या कंपनीतील सुमारे ६० कामगार ११ महिने पगारापासून वंचित राहिल्याने त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

यामध्ये महाराष्ट्र माईन्स वर्कर युनियनचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र धुरी, विजय सावंत, संजय तेली, संदीप कानडे, गुरुनाथ भोगले, शामसुंदर नानचे, संदीप जाधव, सुनील  नानचे, विठ्ठल लाड, अभिमन्यू लाड, रवींद्र सोलकर, विनोद पाटील, रुपेश रेवडेकर, माधुरी लाड, सायली तेली, सुचिता नानचे, आकांशा भालेकर, आदी कामगार सहभागी झाले होते. फोंडाघाट येथील चिराग माईन्स या कंपनीत हे कामगार कार्यरत आहेत. त्यांचे मार्च २०२० पासून चे वेतन मिळालेले नाही.

‘कंपनी व्यवस्थापनाकडे याबाबत वारंवार मागणी करूनही उचित कार्यवाही झाली नसल्याने आंदोलन करण्यास आम्हाला व्यवस्थापनाने भाग पाडले आहे’, असे या कामगारांनी सांगितले. याबाबत ७ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे याबाबत सुनावणी झाली व त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते. ११ जानेवारी पूर्वी यावर चर्चा होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. मात्र आज पर्यंत वेतन मिळालेले नाही किंवा कसलीही चर्चा बैठक झालेली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली असून आम्हाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा