You are currently viewing माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर राजकारणात सक्रिय…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर राजकारणात सक्रिय…

अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे सर्वसामान्य नेतृत्व

संपादकीय

सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द भूषविलेले बबन साळगावकर हे सर्वसामान्य कुटुंबातून उदयास आलेलं नेतृत्व. आपल्या सडेतोड, आक्रमक वृत्तीमुळे आणि निष्कलंक चरित्र्यामुळे राजकारणात एक स्वच्छ राजकारणी म्हणून ओळख निर्माण केली आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची त्यांची वृत्ती, त्यामुळे कोणावर अन्याय होत असेल तर स्वतः त्याच्याविरुद्ध आवाज उठवून निर्भीडपणे मैदानात उतरण्याची त्यांची तयारी असते. बबन साळगावकर हे सुद्धा हाडामासाचे माणूस. माणूस हा कधीतरी चुकतो, आणि तशीच चूक मुरब्बी राजकारणी असूनही त्यांच्याकडून झाली आणि सावंतवाडी सारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहराच्या प्रथम नागरिकाच्या पदाचा त्याग करून त्यांनी घोडचूक केली त्याचीच फळे आज सावंतवाडी नगरपालिकेची सत्ता विरोधकांच्या हाती गेली. ज्या जनतेने बबन साळगावकर यांना डोक्यावर घेतलेलं, प्रथम नागरिक म्हणून निवडून दिलेलं, त्यांनीच त्यांच्या चुकीच्या निर्णयावर नाराज होत अवघ्या तीनशे मतांवर समाधान मानायला लावलं.
सावंतवाडीत सत्तापालट झाल्यावर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांकडून होत असलेली जनतेची हेळसांड, पालिकेत घातलेला हैदोस, नागरिकांवर होणारा अन्याय, आणि विकासकामांचे वाजलेले तिन तेरा यामुळे शहरासाठी अहोरात्र झटलेले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर संतप्त होतात. जनतेची कामे होत नसून वर्षभर पालिकेत चाललेला पोरखेळ, अन्याय त्यांच्या सहनशक्तीच्या पलिकडे झाला आहे त्यामुळेच त्यांनी सक्रिय राजकारणात उतरून सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची जणू प्रतिज्ञाच केली आहे.
सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना बबन साळगावकर यांनी कधी पदाचा दुरूपयोग केला नाही किंवा सरकारी यंत्रणेकडून मिळालेल्या सुविधा स्वतःच्या खाजगी कामांसाठी वापरल्या नाहीत. सकाळी स्वतःच्या घराकडून नगरपालिकेत येताना त्यांनी कधी नगराध्यक्ष म्हणून मिळालेल्या वाहनाचा वापर देखील केला नाही. ते स्वतः चालत आपल्या कार्यालयात यायचे, तिथे वर्तमानपत्र वाचून झाल्यावर एखाद्या मित्राच्या दुचाकीवरून नगरपालिकेत यायचे. नगरपालिकेचे वाहन ते फक्त कार्यालयीन कामासाठीच वापरायचे. यावरून त्यांचा साधेपणा प्रकर्षाने दिसून येतो. सत्ताधारी असताना कधी कुठल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी अन्याय केला नाही किंवा होऊ देखील दिला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ते नेहमीच प्रिय होते. तसेच व्यापारी वर्गावर देखील त्यांनी कधी अन्याय केला नाही. गावागावातून येणारे गोरगरीब भाजीपाला विक्रेते देखील त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही त्रासाशिवाय व्यवसाय करत होते.
आमदार केसरकर यांच्याशी झालेल्या तात्विक वादामुळे बबन साळगावकर यांनी आत्मघाती निर्णय घेऊन पदाचा त्याग केला होता. त्यांच्यावर विश्वास दाखवणारी सावंतवाडीची जनता देखील त्यावेळी त्यांच्या निर्णयावर नाराज झाली होती, मतपेटीतून त्यांनी आपली नाराजी दाखवून दिली होती. काहीअंशी विचार करता राजकारणात सुरू झालेले पैसेवाटप देखील राजकीय उलथापालथ करण्यासाठी कारणीभूत होती. परंतु गेले वर्षभर बबन साळगावकर यांच्या कारकिर्दीत सुरू असलेली कामे पूर्ण करण्या पलीकडे सत्ताधारी मंडळींनी नवीन असे कोणतेही भरीव काम केले नाही. विकासाच्या फक्त बाता मारल्या, २४ तास पाणी देणार म्हणून गर्जना केल्या आणि काहीवेळा २४/२४ तास पाणीच येत नाही. त्यामुळे सावंतवाडीच्या जनतेमध्ये *होते ते बरे होते* अशी कुजबुज सुरू झाली आहे.
शहराच्या विकासासाठी, जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुळात जनतेमध्ये जावे लागते. उंटावर बसून शेळ्या हाकता येत नाहीत. राजकारणाचा अनुभव असून चालत नाही तर जनतेच्या कल्याणासाठी, विकासासाठी राजकीय अनुभवाबरोबर प्रशासकीय कामाचा देखील अनुभव असावा लागतो. प्रशासन गतिमान करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव बबन साळगावकर यांच्याकडे असल्याने, पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेल्या बबन साळगावकरांनी जनतेमध्ये उतरून सावंतवाडीकरांच्या हृदयात शिरले पाहिजे. त्यांची सुख दुःख जाणून घेऊन सक्रियपणे कार्य करून अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे, तरंच सावंतवाडी सारख्या सुंदर शहराच्या प्रथम नागरिक पदाची खुर्ची खेचून आणता येईल,आणि सावंतवाडीच्या जनतेच्या भल्यासाठी पुन्हा मैदानात उतरून तडाखेबाज इनिंग सुरू करता येईल, यात नक्कीच राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव गाठींशी असलेले बबन साळगावकर यशस्वी होतील याबाबत शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 1 =